साकव पूल देताहेत धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 01:31 AM2016-08-04T01:31:24+5:302016-08-04T01:31:24+5:30
गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या बेबडोहोळ येथील पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने त्याचा ताण जुन्या पुलावर येत आहे.
उर्से : गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या बेबडोहोळ येथील पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने त्याचा ताण जुन्या पुलावर येत आहे. हा ४० वर्षांपूर्वीचा जुना साकव पूल व थुगाव येथील साकव पूल केव्हाही ढासळू शकतो. महाड येथील ब्रिटिशकालीन पूल पावसामुळे वाहून गेल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. तालुक्यातील कालबाह्य साकव पुलांचा प्रश्न यांमुळे ऐरणीवर आला आहे. शासनाने त्वरित धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
कासवगतीने सुरू असलेल्या बेबडोहोळ-परंदवडी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी सतत मागणी करण्यात येते. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी तरी हा पूल वाहतुकीसाठी चालू करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील गावकरी करीत दर वर्षी करतात. सन २००८/९ या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे बेबडोहोळ साकव पुलाची नऊ नंबरची मोरी वाहून गेली होती. याच वेळी चांदखेड येथील एक युवकही पुलावरून जाताना वाहून गेला. या दोन्ही गोष्टीची तत्पर दखल घेत या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले. काम चालू झाल्यानंतर पुलाची उंची वाढविण्याच्या मुद्द्यावरून एक वर्ष वाया गेले. यानंतर पुलाची उंची अधिक वाढविल्याने काही जागेच्या तांत्रिक बाबीमुळे पुलाचे काम पुन्हा थांबले होते. नंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले. सद्य:स्थितीत पुलाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. ज्या साकव पुलावरून सध्या वाहतूक चालू आहे, त्या पुलाची वाहतूक वहनक्षमता दोन ते तीन टन एवढीच आहे. मात्र, गेल्या १५ ते २० वर्षांपासून १५ ते २० टनांपर्यंत वाहतूक या पुलावरून केली जात आहे. यामुळे हा खचत चाललेल्या साकव पुलाची केव्हाही पडून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. शासनाला या धोक्याची माहिती असूनही या कालबाह्य पुलावरून वाहतूक चालू आहे. शेजारील नवीन पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे.
पवन मावळातील हा एकमेव मुख्य पूल दळणवळणासाठी वरदान ठरला आहे. पण, नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
थुगाव येथील गेली ४० वर्षांपूर्वीचा साकव पूलही धोक्याची घंटा देत आहे. तरीदेखील या पुलाकडे शासकीय अधिकारी यांची डोळेझाक चालू आहे. सद्य:स्थितीत पुलाचे कठडे तुटले आहेत. जागोजागी पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पुलाची डागडुजी गेल्या चाळीस वर्षांत करण्यात आलेली नाही. या पुलावरून आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, थुगाव, शिवणे, कोथुर्णे या भागातील नागरिकांसाठी हाच वाहतुकीचा मार्ग आहे. उपसरपंच दत्ता ओझरकर या संदर्भात म्हणाले, पुलाची अवस्था दयनीय आहे. डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील अनेक जुन्या साकव पुलांचीही अवस्था वाईट असून, या पुलांची पाहणी करून त्यांची डागडुजी करण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)
>डागडुजीची आवश्यकता
थुगाव येथील पुलाच्या दुरवस्थेबाबत उपसरपंच दत्ता ओझरकर म्हणाले, या पुलाची अवस्था अतिशय खराब असून, पुलाची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. महाड येथील पूल रात्री पुरामुळे वाहून गेल्याने यामध्ये अनेक जण बेपत्ता आहेत. तो पूल ब्रिटिशकालीन व कालमर्यादा संपलेला होता. तालुक्यातील जुन्या साकव पुलांचीही अवस्था वाईट असून, या पुलांची पाहणी करून त्यांची डागडुजी करण्याची वेळ आली आहे.