अकोल्यात कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका! ७५ नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:35 AM2021-02-20T01:35:03+5:302021-02-20T01:35:32+5:30
CoronaVirus : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते.
अकोला : कोरोना संसर्गाच्या फैलावाचा वेग पाहता जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या म्युटेट स्ट्रेनचा धोका वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खबरदारी घेत आरोग्य विभागातर्फे ७५ नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याची माहिती आहे. नमुन्यांचे तपासणी अहवाल येत्या दोन ते तीन दिवसात प्राप्त होणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोटसह महापालिका क्षेत्रातील काही भागात कोरोनाचे नवे हाॅटस्पॉट निर्माण होऊ लागले होते. गत आठवडाभरात रुग्णवाढीचा वेग झपाट्याने वाढला. शेजारच्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातदेखील कोराेनाचा कहर सुरूच आहे.
दरम्यान, अमरावती येथे कोरोनाचा नवा म्युटेट स्ट्रेन असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने येथील काही कोविड रुग्णांचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. या पाश्वभूमीवर अकोला आरोग्य विभागातर्फे गुरुवारी रात्री ७५ कोविड रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले.
कोविड संसर्गात हा आहे बदल
- पूर्वीचा कोरोना
- कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला चार ते पाच दिवसानंतर लक्षणे दिसायची
- सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे.
- ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.
- संसर्गाचा वेग कमी
- म्युटेट स्ट्रेन
- कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला २४ तासांतच लक्षणे दिसायला लागतात.
- सर्दी, कोरडा खोकला, धाप लागणे, ताप येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे.
संसर्गाचा वेग जास्त
जिल्ह्यात कोरोनाच्या फैलावाची गती लक्षात घेता नव्या स्ट्रेनचा धोका नाकारता येत नाही. खबरदारी म्हणून ७५ नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेत.
- डॉ. सुरेश आसोले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला