बिबट्याचा शेतमजूरावर हल्ला

By Admin | Published: April 8, 2017 01:36 AM2017-04-08T01:36:50+5:302017-04-08T01:36:50+5:30

वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे पहाटे शेतमजूर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला

Dangerous attack | बिबट्याचा शेतमजूरावर हल्ला

बिबट्याचा शेतमजूरावर हल्ला

googlenewsNext

कोरेगाव भीमा : वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे पहाटे शेतमजूर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला. त्याच्या पायाला तोंडात पकडून ओढत नेल्याने शेतमजूर जखमी झाला. प्रतिकार केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र तेथून जाताना बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला.
वनपाल बी. आर. ओव्हाळ मात्र न पाहताच हल्ला करणारा बिबट्या नव्हे तरस असल्याचा जावईशोध लावायला विसरले नाहीत. येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष कुंडलीकअप्पा भंडारे यांच्या शेतावर भगवान साठे (वय ४०) हे काम करीत आहेत. साठे हे रात्री आपटी रस्त्यावरील भंडारे यांच्या वीटभट्टीसमोर झोपले होते. पहाटे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पायाला धरून ओढत असताना साठे यांनी आरडाओरड करीत बिबट्याचा प्रतिकार केला. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला.
जखमी साठे यांना प्रथमोपचारासाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यास प्रतिबंधक लसीकरण व पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. साठे यांची प्रकृती आता स्थिर आहे.
ग्रामस्थ धास्तावले
गेली तीन ते चार महिन्यांपासून बिबट्याने कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, वढु बुद्रुक, आपटी या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुमाकुळ घातला आहे. वनविभागास पत्रव्यवहार केल्यानंतर चार-पाच दिवसांनी पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाहीत. आजपर्यंत बिबट्याने शेळी, घोड्याचे पिल्लू , कालवड, कुत्र्यांचा फडशा पाडल्याचा प्रकार घडला होता.
आता बिबट्याने थेट माणसांवरच हल्ला केल्याने येथील ग्रामस्थ धास्तावले आहेत. पिंजरा लावून बिबट्या पकडण्याची मागणी सोसायटीचे माजी अध्यक्ष कुंडलीक भंडारे यांनी केली आहे.
‘तो’ दिसल्यास फटाके कसे वाजवायचे तुम्हीच दाखवा
बिबट्या समोर दिसल्यावर साक्षात मृत्यू समोर असताना वनपाल नागरिकांना फटाके वाजवण्याचा सल्ला देतात. बिबट्याच्या समोर फटाके कसे वाजवायचे, याचे प्रात्यक्षिक वनपालांनीच दाखवावे, असा सावल होत असून फटाके काय खिशात घेऊनच कायम फिरायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली़

Web Title: Dangerous attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.