दुष्काळग्रस्तांची व्यथा : मराठवाड्यातील २६० कुटुंबे मुंबईच्या आश्रयाला
By admin | Published: April 28, 2016 02:26 AM2016-04-28T02:26:25+5:302016-04-28T02:26:25+5:30
हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही; अशी अवस्था झालेल्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.
लीनल गावडे,
मुंबई- हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही; अशी अवस्था झालेल्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांनी मुंबईकडे धाव घेतली आहे. घाटकोपरमधल्या भटवाडी येथे तब्बल २६० दुष्काळग्रस्त कुटुंबे वास्तव्याला आली आहेत. रोजीरोटीसाठी त्यांची वणवण सुरू आहे. भटवाडी येथील महापालिका मैदान क्रमांक दोनमध्ये २६० कुटुंबांतील ८०० लोकांनी उघड्यावर संसार मांडले आहेत. नांदेड आणि लातूरमधून हे दुष्काळग्रस्त आले आहेत. मैदानाच्या परिसरात चिखल साचला आहे. दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरांमुळे समस्येत भर पडत आहे. गावी राहिलेल्या वयोवृद्धांची काळजी त्यांना सतावत आहे.
बांबू, चादर आणि साड्यांच्या मदतीने झोपड्या उभारल्या आहेत. सामान साहित्य झोपडीबाहेर ठेवावे लागत आहे. मैदानात दिवे नाहीत. केवळ एक मोठा दिवा लावण्यात आला आहे. सामान चोरीला जाण्याची भीती आहे. शिवाय अंधारामुळे महिलांना असुरक्षित वाटत आहे. नैसर्गिक विधीसाठी काहीच व्यवस्था नाही. रोजगारच्या आशेने मुंबईत आलेल्या या लोंढ्यांच्या हाताला पुरेसे काम नाही. कधी शंभर रुपये मिळतात तर कधी ४००. ते पुरत नाहीत. गावीही पैसे पाठवावे लागतात. त्यामुळे दुष्काळग्रस्तांची अवस्था कैचीत अडकल्यासारखी झाली आहे.
>गावाची आठवण येते....
गावी शेती आहे. पण पाण्याअभावी शेतात धान्याचा दाणाही उगवलेला नाही. गावात चांगली घरे आहेत. मुंबईत अशा अवस्थेत राहावे लागते; याचे दु:ख आहे. घरची आठवण येते. वृद्धांना गावीच सोडून आलो आहे. त्यांची काळजी वाटते. पाऊस पडला की पुन्हा घरी जायचे आहे.
- नागेश्री राठोड,
सकनूर, नांदेड
>‘शंभर रुपयांत आठवडा काढतो’
दोन मुलींना सासूसोबत सोडून पतीसह मुंबईत आले आहे. रोजगार मिळत नाही. मुंबईत या मैदानावर गेल्या काही वर्षांपासून येत आहोत. येथे रोजगार मिळतो. पाणी मिळते. त्यामुळे दिवस जात आहेत. गाव ओस पडले आहे. रोजगार मिळत असला तरी १०० रुपयांमध्ये आठवडा काढावा लागतो.
- अंजनबाई चव्हाण, बाराळी, ता. मुखेड, जिल्हा नांदेड
>कुटुंबाचे भागते; पण...
वेठबिगारी करुन घर चालवायचो. दुष्काळ भीषण आहे. इथे कधीकधी दिवसाला १५० तर कधी ४०० रुपये मिळतात. त्यात कुटुंबाचे भागते. शिवाय गावी जे आहेत; त्यांचीही जबाबदारी आहे.
- देविदास राठोड,
बाराळी, ता. मुखेड,
जिल्हा नांदेड
>महापालिकेने लक्ष द्यावे...
मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांची व्यवस्था व्हावी म्हणून महापालिकेच्या शाळा उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहे. महापालिकेच्या अखत्यारित सुमारे १ हजार २०० शाळा असून, उन्हाळी सुटीमुळे त्या बंद आहेत. तिथे तात्पुरता निवारा मिळेल. शिवाय त्यांना अन्य मूलभूत सेवासुविधांचाही लाभ मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.