महामार्गावरील थांबे ठरताहेत धोकादायक
By admin | Published: April 27, 2016 01:58 AM2016-04-27T01:58:27+5:302016-04-27T01:58:27+5:30
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीतील बसथांबे मृत्यूचे सापळे बनले आहेत.
लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीतील बसथांबे मृत्यूचे सापळे बनले आहेत. हे थांबे तातडीने बंद करा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सोमवारी या ठिकाणी बसने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जायबंदी झाला. यापूर्वीदेखील या ठिकाणांवर चार ते पाच प्राणांतिक अपघात झाले असून, किरकोळ अपघात कायम होत असतात. असे हे धोकादायक थांबे तातडीने बंद न केल्यास या ठिकाणांवर आंदोलन करण्यात येणार आहे.
मुळातच राष्ट्रीय महामार्ग अरुंद मार्ग असलेल्या वलवण गावात दोन खासगी हॉटेलांना महाराष्ट्र परिवहन विभागाचे अधिकारी व संबंधित मंडळींनी आर्थिक लागेबांध्यावर काही बस थांबवण्याची परवानगी दिली आहे. वास्तवात मात्र लोणावळा शहरातील अधिकृत बसस्थानकात थांबत नाहीत. एवढ्या बस या थांब्यावर थांबतात. यातील काही अधिकृत तर काही अनधिकृत असतात. या बदल्यात हॉटेलचालकांकडून एसटीचे चालक व वाहक यांना फुकट जेवण, मिनिरल वॉटर व पैसे दिले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. तर लोणावळा महाविद्यालयासमोरील एका खासगी बसचे हॉटेल आहे. दिवस-रात्र या ठिकाणी बसेसची वर्दळ सुरू असते.
अतिशय धोकादायक पद्धतीने बसचे चालक या ठिकाणांवर बस आत-बाहेर करतात. यामुळे येथे सातत्याने अपघात घडत आहेत. द्रुतगती महामार्गाचे मुख्य सर्कल, लोणावळा महाविद्यालय याच भागात आहे. तसेच ग्रामीण भागातून
शहरात जाताना याच मार्गावरून नागरिकांना दुचाकीवरून ये-जा
करावी लागत असल्याने हा संपूर्ण परिसर वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.(वार्ताहर)