नद्यांनी ओलांडली धोकादायक पातळी

By Admin | Published: August 3, 2016 02:46 AM2016-08-03T02:46:09+5:302016-08-03T02:46:09+5:30

महाबळेश्वरच्या पायथ्याशीच असणाऱ्या पोलादपूर येथे २५६ मिमी तर महाड येथे २३० मिमी अशा विक्रमी पावसाची नोंद झाली

Dangerous levels crossed rivers | नद्यांनी ओलांडली धोकादायक पातळी

नद्यांनी ओलांडली धोकादायक पातळी

googlenewsNext


अलिबाग : गेल्या चोवीस तासांत महाबळेश्वरमध्ये ३१९ मिमी तर महाबळेश्वरच्या पायथ्याशीच असणाऱ्या पोलादपूर येथे २५६ मिमी तर महाड येथे २३० मिमी अशा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या सावित्री नदीने महाडमध्ये धोकादायक जलपातळी ओलांडून पुराचे पाणी महाड बाजारपेठ व परिसरात घुसले आहे.
महाबळेश्वरसह पोलादपूर व महाडमध्ये संततधार सुरूच असल्याने सावित्री नदीची जलपातळी सातत्याने वाढत आहे. नदीची धोकादायक पूर पातळी ६.५० मीटर असून सद्यस्थितीत जलपातळी ६.५० मीटर इतकी झाली आहे. मंगळवारी अमावस्या असून समुद्रास पूर्ण भरती ११.१५ वाजता होती. त्यामुळे पश्चिम वाहिनी नद्यांच्या पुराच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे वेगाने होत नव्हता. ओहोटी सुरु झाल्यावर नद्यांची जलपातळी कमी येवू शकेल, असा अंदाज महाड-पोलादपूरच्या पूर्वीच्या एमएमएचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
महाडमधील सावित्री नदीबरोबरच जिल्ह्यातील उर्वरित नद्यांच्या जलपातळीत देखील विक्रमी वाढ झाली आहे. अंबा नदीची नागोठणे येथे जलपातळी ६ मीटर (धोकादायक पूर पातळी ९ मी.) झाली आहे. कुंडलिका नदीची डोलवहाळ येथे जलपातळी २३ मीटर (धोकादायक पूर पातळी २३.९५मी.) झाली आहे. पाताळगंगा नदीची लोहोप येथे जलपातळी १८.९२ मीटर (धोकादायक पूर पातळी २१.५२मी.) झाली आहे. उल्हास नदीची कर्जत येथे जलपातळी ४३ मीटर (धोकादायक पूर पातळी ४८.७७मी.) झाली आहे. गाढी नदीची पनवेल येथे जलपातळी ३ मीटर (धोकादायक पूर पातळी ६.५५मी.) झाली आहे. भिरा धरणाचे तीन दरवाजे ०.२५ सेंमी उघडले, ८३.२० क्युसेक्स जल विसर्ग सुरू झाला आहे. भिरा धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १४९.४० मिमी पाऊस झाला तर यंदाच्या पावसाळ््यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत येथे एकूण २८४२.२० मिमी पाऊस झाल्याने भिरा पिकअप धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील जलपातळी धोक्याच्या खाली राखण्याकरिता धरणाचे तीनही दरवाजे ०.२५ सेमी उघडण्यात आले असून त्यातून सद्यस्थितीत ८३.२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. जलविसर्गामुळे कुंडलिका नदीच्या जलपातळीत वाढ झाली आहे. परिणामी रोहा अष्टमी पुलास कुंडलिका नदीचे पाणी पोहोचले आहे. रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती नियंत्रणाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
>जिल्ह्यात पर्जन्यमान
मुरु ड-१२२ मि.मी., अलिबाग-६३ मि.मी. पेण-६४ मि.मी., पनवेल४३.२० मि.मी., उरण-३२ मि.मी., कर्जत-९६.८० मि.मी., खालापूर-७४ मि.मी., माणगांव-१९४ मि.मी., रोहा-१४२ मि.मी., सुधागड पाली-१२९ मि.मी., तळा-१४० मि.मी., महाड-२३० मि.मी., पोलादपूर-२५६ मि.मी., म्हसळा-१८१.६० मि.मी., श्रीवर्धन-१३३ मि.मी., माथेरान-४३ मि.मी. जिल्ह्यात एकूण १९४३.६०मि.मी.पाऊस पडला असून हे सरासरी पर्जन्यमान १२१.४८ मि.मी. आहे.
>महाड बाजारपेठेतही पुराचे पाणी
महाड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ, गांधारी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांचे पाणी सोमवारी शहरात शिरल्याने सखल भाग पाण्याखाली होता. दस्तुरी नाका मार्ग, क्रांतिस्तंभ परिसर, अर्जना भोई मार्ग, मुख्य बाजारपेठ, गाडीतळ, बंदरनाका या ठिकाणी पुराचे पाणी दिवसभर होते. मुख्य बाजारपेठेतील भगवानदास बेकरी ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या मार्गावर सुमारे दोन ते तीन फूट पुराचे पाणी होते. तर दस्तुरी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शहराकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
>पोलादपूरमध्ये दरड कोसळून एक ठार
पोलादपूर : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ अतिवृष्टीमुळे घरावर दरड कोसळून उदय मारु ती चिकणे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. घरातील अन्य व्यक्ती बाहेर गेल्याने बचावल्या. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. तुर्भे विभागातील वझरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्याने त्या विभागातील सात वाड्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या रस्त्याची बांधकाम उपविभागातील उपअभियंता सदानंद शिर्के, जे.इ. जगताप यांनी पाहणी केली.आंबेनळी घाटातील दरड रस्त्यावर आली असली तरी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. कुडपन रस्त्यावर दरड आल्याने वस्तीची एसटी अडकून पडली. दरड हटविण्याचे काम चालू असून लवकरच रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती बांधकाम विभागाने दिली.सवाद गावात सावित्री नदीचे पाणी काही घरांमध्ये शिरले. काटेतळी, कापडेखुर्द येथे वाड्या, घरांचे नुकसान झाले आहे. पितळवाडी बोरज फाटा दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाला भेगा पडल्याची अफवा पसरल्याने हा पूल बंद करण्यात आला होता.

Web Title: Dangerous levels crossed rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.