मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार - विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 05:10 PM2017-12-20T17:10:40+5:302017-12-20T18:21:20+5:30
रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे.
रत्नागिरी - एखादा प्रकल्प आणला कोणी, याचे श्रेय लाटण्यासाठीचा वाद होणे, ही तशी नेहमीचीच गोष्ट. पण आता राजापूर तालुक्यातील नियोजित रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे. शिवसेनेचे कोकणातील दोन्ही खासदार या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर येथे केल्यानंतर आज खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत हा प्रकल्प फडणवीस यांनीच आणल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तरहा प्रकल्प आपण आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुरावे दिले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव करण्याचा इशाराही दिला आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे अशा १४ गावांमध्ये देशातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला परिसरातील एका गटाने पाठिंबा तर एका गटाने विरोध दर्शविला आहे. लोकांचा विरोध वाढल्यामुळे आता शिवसेनेनेही प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. सेनेच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना काल मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत प्रश्न केला गेला. या प्रकल्पासाठी रत्नागिरी तसेच रायगडचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते आग्रही होते, आता त्यांची भूमिका बदलली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
शिवसेनेनेच हा प्रकल्प आणल्याचा संदेश सर्वत्र गेल्यामुळे त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे विनायक राऊत यांनी आपली भूमिका मांडत हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनीच आणला असल्याचा पलटवार केला आहे. आपण कधी मागणी केली, कोणाकडे मागणी केली, पंतप्रधान किंवा पेट्रोलियम मंत्र्यांना कधी भेटलो, याचा पुरावा त्यांनी द्यावा, नाहीतर आपले चारित्र्यहनन केल्याचा हक्कभंग ठराव आपण संसदेत आणू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.