गटारे तुंबल्याने आरोग्य धोक्यात
By admin | Published: June 27, 2016 01:21 AM2016-06-27T01:21:37+5:302016-06-27T01:21:37+5:30
बारामती-राशिन मार्गावरील तक्रारवाडी गावातील गटारे तुंबल्याने डासांची वाढ झाली आहे.
भिगवण : बारामती-राशिन मार्गावरील तक्रारवाडी गावातील गटारे तुंबल्याने डासांची वाढ झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारीच गटार तुंबले आहे. डासांबरोबरच दुर्गंधीदेखील वाढली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बारामती-राशिन रोडवरील तक्रारवाडी गावातील गटारी तुंबल्याने गावात डासांची पैदास वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारीच गटारी असून आरोग्य सुधारणा होण्यासाठी आलेल्या रुग्णाला डास चावून आणखीनच आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तक्रारवाडी हे गाव १०० टक्के भूमिगत गटार योजनेने समृद्ध झालेले आहे. याचे पाणी नैसर्गिक उताराच्या दिशेने गावाबाहेर सोडलेले आहे. बारामती-राशिन रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील पुलातून वाहणारे पाणी नळीत असणाऱ्या दगड धोंड्यामुळे गावाच्या बाजूला साचले आहे. याची मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नागरिक डास आणि दुर्गंधीमुळे हैराण झालेले आहेत. ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याशी पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
खासगी पाइपलाइनचा अडथळा
पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. याकडे सावर्जनिक बांधकाम विभागाचे सेवक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वास्तविक पाहता या पाणी वाहून जाण्याच्या पाईपमधून पाणी जाण्याऐवजी खासगी लोकांच्या पाइपलाइन गेलेल्या आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यातील पाइपलाइन काढून टाकणे गरजेचे आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यकारिणीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात संपर्क साधून कारवाईबाबत विचारले असता गटार उपसण्याची यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर यावर काम केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.