डेंगीने घेतला एकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 01:38 AM2016-09-21T01:38:00+5:302016-09-21T01:38:00+5:30
जानकू गेणू गांजे (वय ४०) यांचे सोमवारी (दि. १९) पुण्यातील खासगी दवाखान्यात डेंगीच्या आजाराने निधन झाले.
टाकळी हाजी : सरदवाडी (जांबूत, ता. शिरूर) येथील जानकू गेणू गांजे (वय ४०) यांचे सोमवारी (दि. १९) पुण्यातील खासगी दवाखान्यात डेंगीच्या आजाराने निधन झाले. यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने या परिसरामध्ये योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जानकू गांजे या परिसरामध्ये शाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना आठ दिवसांपूर्वी डेंगीची लागण झाली होती. ताप आला म्हणून ते स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेत होते. परंतु एवढे करूनही ताप कमी होत नसल्याने त्यांनी शिरूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांना डेंगीच्या आजाराची लक्षणे जाणवली. तेव्हा गांजे यांना नातेवाईकांनी पुणे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु आजार आवाक्याबाहेर गेल्याने त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
>‘सरदवाडी परिसरामध्ये आम्ही समक्ष पाहणी केली. या ठिकाणी डेंगीसदृश अशी परिस्थिती दिसत नाही. संपूर्ण परिसराची पाहणी केली असता डेंगीचे मच्छर अथवा त्यांची अंडी आढळून आलेली नाही. तरीही या ठिकाणी धूळफवारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी उपाययोजना राबवण्याचे काम चालू आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून स्वच्छता राखावी.’
- दिनेश महाजन, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी