घराणेशाहीला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 01:52 AM2017-02-28T01:52:19+5:302017-02-28T01:52:19+5:30
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घराणेशाहीचे राजकारण रुजू लागले होते.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात घराणेशाहीचे राजकारण रुजू लागले होते. घरात सत्ता खेळवत ठेवण्याचे नेत्यांचे स्वप्न मतदार राजाने धुळीस मिळविले आहे. पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांनी कुटुंबातील व्यक्तींनाच राजकीय वारसदार म्हणून निवडणुकीत उतरविले होते. मात्र, घराणेशाहीतील ३४ पैकी तब्बल २५ उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे. त्याचवेळी मतदार राजाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गाववाले, बाहेरवाले हे राजकारण आणि गावकी-भावकी, घराणेशाहीचे राजकारण रुजले आहे. कुटुंबातच सत्ता राहावी, असा अट्टहास नेत्यांचा राहिला आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. महापालिकेत ५० टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर पदाधिकारी, नगरसेवकांनी कुटुंबातील महिलांना उमेदवारी दिली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत उद्योगनगरीतील राजकीय नेत्यांनी घराणेशाहीस प्राधान्य दिल्याचे चित्र होते. मुलगा, मुलगी, आई, पत्नी, भाऊ, भावजय, चुलतभाऊ, मावसभाऊ यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली होती. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी देताना घराणेशाही जपली होती. मात्र, मतदारांनी मोडीत काढली. (प्रतिनिधी)
>राजकीय पदाधिकारी, नेत्यांचे नातेवाईक पराभूत
भोसरी विधानसभेतील प्रभाग पाचमधून आमदार महेश लांडगे यांनी बंधू सचिन यांना भाजपपुरस्कृत म्हणून रिंगणात उतरविले. त्याचबरोबर माजी नगरसेवक राजू दुर्गे यांची मुलगी तेजस्विनी, माजी नगरसेवक तानाजी वाल्हेकर यांची पत्नी शोभा, रघुनाथ वाघ यांची पत्नी रजनी, दशरथ लांडगे यांचा चिरंजीव कुणाल, रमण पवार यांचा चिरंजीव संदीप, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे यांची सून दीपिका, माजी नगरसेवक प्रधान कुंजीर यांचा मुलगा कैलास,
प्रभाग अठरामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे यांचा चिरंजीव भारत केसरी विजय यांना, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमल साळुंके या प्रभाग आठमधून, नगरसेवक चंद्रकांत वाळके यांची पत्नी कल्पना, जितेंद्र ननावरे यांची पत्नी प्रियंका, स्वीकृत सदस्य हमीद शेख यांच्या मातोश्री मुमताज, तानाजी खाडे यांची भावजय मालन खाडे,
माजी नगरसेवकांचा चिरंजीव योगेश गवळी, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड यांची कन्या रमा गायकवाड, माजी नगरसेवक महेश चांदगुडे यांची पत्नी सुप्रिया, विश्वास गजरमल यांची पत्नी वीणा, माजी नगरसेवक शशीकिरण गवळी यांची सूनबाई अनु, राजू लोखंडे यांची पत्नी चंदा, एकनाथ मोटे यांचा चिरंजीव अमोल, विजय लांडे यांची पत्नी वैशाली हे पराभूत झाले.