बेदरकार ट्रकचालकाने दोघांना चिरडले !
By admin | Published: January 7, 2016 02:11 AM2016-01-07T02:11:39+5:302016-01-07T02:11:39+5:30
शहराजवळच्या संगममाहुली पुलावर बुधवारी दुपारी बेदरकार ट्रकचालकाने तीन वाहनांना दिलेल्या धडकेत बालिकेसह दोनजणांचा जागीच मृत्यू झाला
सातारा : शहराजवळच्या संगममाहुली पुलावर बुधवारी दुपारी बेदरकार ट्रकचालकाने तीन वाहनांना दिलेल्या धडकेत बालिकेसह दोनजणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मधुरा धमेंद्र शिर्के (३) आणि संतोष अशोक चव्हाण (३८) अशी मृतांची नावे असून प्रकाश बाबूराव चव्हाण (६९) आणि तानाजी प्रकाश पवार (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
लोखंड भरलेला एक ट्रक साताऱ्याहून कोरेगावकडे निघाला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास संगममाहुली पुलाजवळील वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. याचवेळी समोरून कोरेगाव-सातारा एसटी येत होती. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याचे ध्यानी येताच एसटी चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ट्रकने एसटीच्या उजव्या बाजूला जारेदार धडक दिली. रस्त्याकडेला असलेल्या दिशादर्शक खांबाला अडकल्याने एसटी पुलाच्या भरावावरून सुदैवाने कोसळली नाही.
एसटीला धडक दिल्यानंतर ट्रक तसाच पुढे गेला आणि समोरून येणाऱ्या संतोष चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. खटावहून साताऱ्याकडे येत असलेल्या कारलाही ट्रकने धडक दिली. यात कारमधील मधुरा शिर्के हिचाही जागीच मृत्यू झाला तर इतर सहाजण जखमी झाले. (प्रतिनिधी)