डेंग्यूची साथ खरी की खोटी?

By Admin | Published: September 25, 2016 01:43 AM2016-09-25T01:43:21+5:302016-09-25T01:43:21+5:30

गेल्या काही वर्षांत राज्यभरात पावसाला सुरुवात झाल्यावर ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरिस या आजारांच्या साथींच्या बातम्या मोठ्या प्रमाणात यायला लागतात.

Danguechi ki khali khaki ka? | डेंग्यूची साथ खरी की खोटी?

डेंग्यूची साथ खरी की खोटी?

googlenewsNext

- पूजा दामले

गेल्या काही वर्षांत राज्यभरात पावसाला सुरुवात झाल्यावर ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरिस या आजारांच्या साथींच्या बातम्या मोठ्या प्रमाणात यायला लागतात. पावसाळ््यात पसरणाऱ्या या साथींमुळे काहींचे बळी जातात. सध्या राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट्स कमी होऊन जिवाला धोका निर्माण होतो.

डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट्स चढवण्यात येतात. परिणामी, प्लेटलेट्सची मागणी वाढते आणि किमतीही. यात भरडला जातो तो सामान्य माणूस, पण अधिकृत प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्टकडून रक्त तपासणी करून घेतल्यास होणारी फसवणूक नक्कीच थांबू शकते आणि ‘डेंग्यूचा ताप’ ही उतरू शकतो.

पावसाला सुरुवात झाल्यावर सार्वजनिक आणि घराच्या परिसरात पाणी साचून राहते. अनेकदा साठलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते, पण या साचलेल्या पाण्यातच डेंग्यूच्या डासांची म्हणजे एडिस इजिप्ती डासांची पैदास होते. एका ठिकाणी सात दिवस पाणी साचून राहिल्यास तिथे या डासांची पैदास होते.
एडिस इजिप्ती डास चावल्याने डेंग्यूचा ताप येतो. ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी येणे ही सामान्य तापाची लक्षणेच डेंग्यू आणि मलेरियाच्या तापातदेखील असतात. त्यामुळे ताप आल्यावर व्हायरल फिवर, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरसिस, टायफॉईड यापैकी कोणताही ताप असू शकतो. ताप नक्की कसला आहे, याचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते, पण अनेकदा योग्य पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने रक्त तपासणी न झाल्यास योग्य निदान होत नाही. त्यामुळे साथीच्या आजारांची गंभीर परिस्थिती निर्माण होते.
ताप आल्यावर डॉक्टर कम्पिल्ट ब्लड काउंट (सीबीसी)ची तपासणी करण्यास सांगतात. त्याबरोबरीने डेंग्यू आणि मलेरियाची तपासणी करण्याचा सल्लाही दिला जातो. पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रशिक्षित एमडी अथवा तत्सम शिक्षण घेतलेला पॅथॉलॉजिस्ट असल्यास सीबीसी तपासणीत फक्त ब्लड काउंट अहवाल म्हणून देत नाही, तर रक्ताचा नमुना स्लाइडवर पाहतो. रक्ताचा नमुना स्लाइडवर पाहिल्याने मार्फालॉजीचा अभ्यास करतो. या मार्फालॉजीवरून रक्तात किती प्लेटलेट्स आहेत, किती दिवसांनी प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका आहे, याची सविस्तर कल्पना येते. हा अहवाल पॅथॉलॉजिस्ट देतो, पण राज्यात अनेक पॅथॉलॉजी लॅबमध्ये एमडी अथवा तत्सम शिक्षण घेतलेले पॅथॉलॉजिस्ट नसल्याने, फक्त ब्लड काउंट दिला जातो. त्यामुळेच साथींच्या आजारांची साथ मोठ्या प्रमाणात पसरते.
काही रुग्णांना व्हायरल फिवर असतो. व्हायरल फिवरमध्ये शरीरात बदल होतात. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे, काही वेळा प्लेटलेट्सचा एक गठ्ठा तयार होता. त्यामुळे सीबीसीमध्ये प्लेटलेट्सचा काउंट हा १० ते १५ हजार असल्याचे दाखविले जाते. प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या शरीरात प्लेटलेट्स १ लाख ४० हजार किंवा दीड लाख म्हणजे योग्य प्रमाणात असतात, पण काउंट कमी येत असल्याने, त्या व्यक्तींना प्लेटलेट्स चढवल्या जातात, पण प्लेटलेट्स वाढत नाहीत. त्या व्यक्तीच्या शरीरात योग्य प्रमाणात प्लेटलेट्स असूनही अधिक प्लेटलेट्स दिल्याने त्याच्या शरीराचे अधिक नुकसान होत नाही, पण त्या व्यक्तीला सुमारे सहा व्यक्तींच्या प्लेटलेट्स दिल्या जातात. म्हणजे त्याला रक्तसंक्रमणातून होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो, हे अत्यंत चुकीचे आहे. अनेकदा नर्सिंग होम अथवा लहान रुग्णालयाच्या इन हाउस पॅथॉलॉजी लॅब असतात. या लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नसतात. त्यामुळे रुग्णाला दाखल करून देण्यासाठी खोटा अहवाल दिला जातो. राज्यात असणाऱ्या बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबमुळेही अनेकदा खोटे अहवाल जाणूनबुजून दिले जातात. त्याचबरोबर, या बोगस पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्यांना वैद्यकशास्त्र आणि शरीरशास्त्राचे ज्ञान नसते. त्यामुळे मशिनवर आलेले रीडिंग छापून दिले जाते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईडसारख्या आजारांचा आकडा वाढलेला दिसतो, तर काही वेळा डेंग्यू, मलेरियाची साथ पसरल्याचे भीषण चित्र उभे राहते. त्यामुळे या सगळ््यातून रुग्णांचा खरा आकडा कधीच समोर येत नाही, तर दुसरीकडे अनेक रुग्णांना चुकीचे उपचार मिळतात, हे स्पष्ट झाले आहे.

रुग्णांनी सतर्क राहावे!
ताप आल्यावर अनेकदा रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक घाबरून जातात. तत्काळ रक्त तपासणी केली जाते, पण ही रक्त तपासणी कोणत्या पॅथॉलॉजी लॅबमधून करत आहोत, याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेही फसवणूक होण्याचा धोका वाढतो. प्रशिक्षित अधिकृत पॅथॉलॉजिस्टकडून तपासण्या करून घेतल्यास रक्त तपासणी अहवाल योग्य आणि अचूक मिळतील. त्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होण्यास मदत होईल. सरकारने ही साथींचे आजार वाढत आहेत, त्यावर उपाय म्हणून बोगस पॅथॉलॉजी लॅबना बंद करणे हा विचार पक्का केल्यास नक्कीच साथीच्या आजारांना काही आळा घालण्यास नक्कीच मदत होईल.
- डॉ. संदीप यादव, अध्यक्ष,महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट

Web Title: Danguechi ki khali khaki ka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.