दप्तराला एक दिवसासाठी बाय!
By Admin | Published: February 17, 2015 01:39 AM2015-02-17T01:39:13+5:302015-02-17T01:39:13+5:30
खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत.
साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूर
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रघात निर्माण झाला असताना खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता शिवजयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ‘एकच ध्यास करू अभ्यास’ हे ५५ दिवसांचे विशेष अभियान शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २५ फेब्रुवारीला राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी दप्तराविना जातील.
१९ फेब्रुवारीला शिवजयंती तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या कालावधीत अनेक महापुरुषांची जयंती आहे. राज्यातील या महापुरुषांनी राज्याच्या उत्कर्षाची, उन्नतीची, विकासाची स्वप्ने पाहिली आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची राज्यातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्तजिल्हा परिषद शाळांत गुणवत्तेवर आधारित एक रचनात्मक कार्यक्रम आयोजित करून या महापुरुषांना वंदन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक पत्रक काढले आहे. ५५ दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, २५ फेब्रुवारीला दप्तराविना शाळा सुरू राहणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांत भाषिक कौशल्ये विकसित केली जाणार असून, कृती कौशल्याच्या विकासासाठी अध्ययन शाळांतून दिले जाणार आहे. यात रंगीत कागदाच्या वस्तू तयार करणे, मातीच्या वस्तू, रांगोळी, मुक्तचित्र काढून घेण्यात येणार असून, क्रीडा तसेच गाणे म्हणण्याला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
सदर अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांसह पालक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची राहणार आहे.
च्प्रत्येक गावात आनंददायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील २ कोटी विद्यार्थी ५ मार्च रोजी एकाच दिवशी सकाळी १० वाजता ५ राष्ट्रभक्तीपर गीते गाणार आहेत. यातून वातावरणनिर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचे गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.