दापोलीच्या आमदाराला कारावास
By admin | Published: December 3, 2015 12:40 AM2015-12-03T00:40:01+5:302015-12-03T00:40:01+5:30
उपविभागीय अधिकाऱ्याला धमकावणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दापोलीतील आमदार संजय वसंत कदम यांच्यासह ६ जणांना खेड येथील दिवाणी न्यायाधीश एस. आर. पाटील
खेड (रत्नागिरी) : उपविभागीय अधिकाऱ्याला धमकावणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दापोलीतील आमदार संजय वसंत कदम यांच्यासह ६ जणांना खेड येथील दिवाणी न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
चिंचघर प्रभूवाडीतील नुकसानीसंदर्भात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार व तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य संजय कदम हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत २९ जुलै २००५ रोजी सकाळी खेड येथील तहसीलदार कार्यालयात आले.
तेथील लिपिक संध्या बांदिवडेकर यांना या नुकसानीचे पंचनामे का केले नाहीत, असा जाब विचारला. यावेळी तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी हस्तक्षेप करीत, कर्मचारी अपुरे आहेत तरीही २४ तास काम करीत आहोत.
ज्या कोणाचे नुकसान झाले असेल, त्यांना माझ्याकडे घेऊन या, असे कदम यांना सांगितले. त्यानंतर कदम यांनी तेथील खुर्ची उचलली व ‘येथून चालते व्हा आणि खेडमध्ये पुन्हा पाऊल टाकू नका,’ असे गेडाम यांना बजावले. त्यांनी व
त्यांच्या समर्थकांनी खुर्ची व टेबल उचलून तोडले, खुर्च्यांची फेकाफेक केली़
या प्रकारामुळे प्रवीण गेडाम घाबरले आणि पोलीस स्थानकात गेले. तत्कालीन नायब तहसीलदार मोहन गेजगे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संजय वसंत कदम (चिंचघर) यांच्यासह प्रकाश गोपाळ मोरे (कोरेगाव), सुषमा विश्वास कदम (हुंबरी), नामदेव बा. शेलार (सध्या भरणे), विजय भिकाजी जाधव (तळे), हरिश्चंद्र लक्ष्मण कडू (चिंचघर) या कार्यकर्त्यांविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांना प्रत्येकी १ वर्षाचा कारावास आणि २१ हजारांचा दंड ठोठावला.
दोन महिला फितूर : या खटल्यात विशेष म्हणजे तत्कालीन तहसीलदार कार्यालयातील दोघा महिला कर्मचारी यांनी खोटी साक्ष दिली होती. त्यांना फितूर घोषित करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांच्याबाबतचा अहवाल मागविला आहे.
पंचनामे तातडीने होऊन गरजूंना नुकसानभरपाई मिळण्याबाबत मी त्यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. न्यायालयाचा मी आदर करतो़ मी आता जिल्हा सत्र न्यायालयात अपिल करणार आहे.
- संजय कदम, आमदार