रचना दर्डा व आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 05:55 PM2017-10-28T17:55:14+5:302017-10-28T18:24:31+5:30
‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा आणि मुलगा आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज मुंबईत शुभारंभ झाला आहे.
मुंबई- ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा आणि मुलगा आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज मुंबईत शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. यावेळी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना छायाचित्र प्रदर्शनाचं भरभरून कौतुक केलं. या प्रदर्शनातून भारताचं चित्र पाहायला मिळतं आहे. खरा भारत जून भारत छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. तर तरूण कलाकार आर्यमन दर्डा यांचीही कलाकृती उत्तम असून वन्यजीवांची अनोखी कलाकृती इथे पाहायला मिळाली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आर्यमन दर्डा यांचं कौतुक केलं आहे. छायाचित्र जशी उत्तम आहेत, तसंच त्यामागील उद्देशही उत्तम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हंटलं.
अमृता फडणवीस यांनी रचना दर्डा व आर्यमन दर्डा या दोघांच्याही कामाचं कौतुक केलं आहे. छायाचित्र प्रदर्शन सगळ्यांना मंत्रमुग्ध करेल असं आहे. अतिशय उत्तम प्रकारे कला सादर केली असून सगळ्यांनी हे प्रदर्श पाहायला हवं, असं मत यावेळी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
आपला छंद असो वा आवड, त्या माध्यमातून समाजाच्या विकासाकरिता हातभार लावणे हा विचार दुर्मीळच. मात्र, या विचारावर आधारलेले एक विशेष छायाचित्र प्रदर्शन कलारसिकांच्या भेटीस आलं आहे. माय-लेकांनी आपल्या रोजच्या जगण्यातील छायाचित्रणाची आवड जपत, सामाजिक जबाबदारी ओळखून विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा यांचे देशभरातील विविध ठिकाणची प्राचीन परंपरा, कला संस्कृतीचे; तर त्यांचे पुत्र आर्यमन दर्डा यांनी जगभरातील जंगलातून वन्यजीव छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहेत.
भायखळ्यामधील ‘द ग्रेट ईस्टर्न मिल कम्पाउंड’ येथील ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’ येथे प्रदर्शना कलारसिकांसाठी सुरू झालं आहे.
रचना देवेंद्र दर्डा यांनी राजस्थान, महाराष्ट्र, कोलकाता, मध्य प्रदेश आदी राज्यांतील विविध व्यक्ती, निसर्ग, प्राचीन स्थळे यांचे छायाचित्रण केले आहे. ‘ब्राऊन’ असे या प्रदर्शनाचे नाव असून यामध्ये देशभरातील मातीशी जोडलेल्या सर्वसामान्यांची वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या फोटोंचा समावेश आहे. या छायाचित्रांत त्या-त्या राज्यांतील संस्कृती आणि विचारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून येणारे सर्व उत्पन्न ग्रामीण भागातील पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. शिवाय, त्यांना शालेय साहित्य, गणवेश आदींसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.
दहावीत शिकत असलेले आर्यमन देवेंद्र दर्डा हे पंधरा वर्षांचे आहेत. शालेय अभ्यासाबरोबरच त्यांना लहानपणापासून पर्यावरण आणि निसर्गाच्या संवर्धनाची विशेष आवड आहे. त्यातूनच त्यांनी ‘लिटिल प्लॅनेट फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. केनिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका येथे जंगल सफारी करीत, वन्यजीवन आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ‘सँक्चुरी एशिया’ या संस्थेचे संस्थापक बिट्टू सहगल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यमन हे मागील सहा महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत.
या प्रदर्शनातून मिळणारा सर्व निधी वन्यजीवन आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी देण्यात येणार आहे. हे छायाचित्र प्रदर्शन २७ ते ३० ऑक्टोबरपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांसाठी खुले राहणार आहे.