अवघा रंग एक झाला
By Admin | Published: February 20, 2016 01:27 AM2016-02-20T01:27:56+5:302016-02-20T01:27:56+5:30
संमेलन कोणतंही असो, न दिसणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड धावपळ, अथक मेहनत आणि नियोजन यामुळे ते आकाराला येतं. त्याचाच प्रत्यय आला
संमेलन कोणतंही असो, न दिसणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड धावपळ, अथक मेहनत आणि नियोजन यामुळे ते आकाराला येतं. त्याचाच प्रत्यय आला, तो अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात.
ठाण्यात होणारं हे पहिलंवहिलं संमेलन.
श्री स्थानकातलं.
आधी भरपूर चर्चा झाली, तयारीची वर्णनं आली. मानापमान नाट्यं रंगली. संमेलनपूर्व कार्यक्रमातील उशिरापासून त्यातील सहभागापर्यंतची वर्णनं आली. पण गेल्या दोन दिवसांत संमेलनपूर्व कार्यक्रमांना आणि संमेलनाचे मार्ग, परिसर सजवण्याला ठाणेकरांनी जो प्रतिसाद दिला, विविध संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, तो पाहता ‘ठाणे तिथे काय उणे’ याचाच प्रत्यय आला.
‘रात्रीचा समय सरूनी होत उष:काल हा’ म्हणत शुक्रवारी सकाळी सजलेल्या मैफलीनं अवघा नूर पालटून टाकला आणि नाट्यदिंडीच्या उत्साहात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवून ठाण्याचं चैतन्य अखिल भारतीय पातळीवर नेलं.
नाट्यसृष्टीतले नाना रंग, त्याचे विविधरंगी पदर, लोककलेची गाज, संस्कृतीचा साज यामुळे संमेलननगरी नटूनथटून रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांच्या स्वागताला सज्ज झाली. नाही नाही म्हणता आकाशकंदिल चमचमले. दीपोत्सवातील मंद प्रकाशाने स्नेहाची ज्योत तेवत ठेवली... आणि गेला महिनाभर कुठे तयारी दिसत नाही म्हणणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का मिळाला.
नाट्यदिंडीतील मुलांचा सहभाग, त्यांचा-त्यांच्या शाळांचा उत्साह, फ्लोटवर तोल सांभाळत त्यांनी सादर केलेले नाट्यप्रवेश... ठाण्यातील नाट्यपरंपरेचा जागर... आदिवासींनी तारपाच्या तालावर धरलेला फेर, पारंपरिक वेशभूषेत नटूनथटून आलेल्या ललना, ढोल-लेझीमचा घोष यामुळे दुपारपासून अवघ्या ठाण्याला संमेलनाचे वेध लागले...
रंगभूषेच्या दुनियेत वावरणाऱ्यांना, त्याच्या भोवताली राहून हे क्षण मोबाइलमध्ये टिपणाऱ्यांना, सेल्फी-क्लीप काढणाऱ्या-फेसबुकवर- व्हॉटसअॅपवर- सोशल मीडियात ‘अपलोड’ होणाऱ्यांनाही पाहता पाहता तो रंग लागला...
अन अवघा रंग एक झाला!
संमेलन असो की कोणताही मराठमोळा सोहळा, त्यात नेहमी वेगवेगळे नाद ऐकू येतातच. त्याविना त्यात रंग भरत नाहीत. कधी ते नाद मंजुळ असतात, तर कधी खणखणाटाच्या पातळीवरचे; पण जेव्हा प्रत्यक्ष सोहळ््यात रंग भरू लागतात तेव्हा मात्र अवघे जात, धर्म, पंथ, पक्ष असे नाना रंग एकरूप होतात. नाना रंगी भिरभिऱ्यात जसे सारे रंग स्वत:चं अस्तित्व विसरून एकाच रंगात परावर्तीत होतात, तसंच त्यांचंही होत गेलं.
त्यांचंच प्रत्यंतर ठाण्यातल्या या संमेलनातही आलं...
अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग!