इंद्रायणी घाटावर अंधार
By Admin | Published: June 11, 2016 01:38 AM2016-06-11T01:38:30+5:302016-06-11T01:38:30+5:30
ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा १५ दिवसांवर येऊन ठेपला
आळंदी : ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, त्या सोहळ्यासाठी परराज्यातील दुर्गम भागातून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भाविकही आषाढ वारीपूर्वीच माऊलींचे व तद्नंतर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. आळंदीत दाखल झालेले वारकरी इंद्रायणीत पवित्र स्नान करून मगच माऊलींचे दर्शन घेतात. प्रत्येक वारकऱ्याचा इंद्रायणी घाट जिव्हाळ्याचा व श्रद्धेचा विषय आहे; परंतु हाच घाट गैरसोयींचा सामना करीत असून, घाटावरील विद्युत दिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. घाटावर दोन ठिकाणी चार ते पाच दिव्यांचा संच असलेले हायमास्ट दिवे आहेत. हे दिवेच बंद पडले असून, अंधारात भाविकांना पायऱ्या उतरून नदीत स्नान करणेही अवघड जात आहे. अंधारात पायऱ्या दिसत नसल्याने वृद्ध वारकरी पाय घसरून पडल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. छोटे खांब उभारून त्यावरही विद्युत दिवे बसवून प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे; परंतु ते दिवेही बंद असल्याने प्रकाशव्यवस्थेचा खोळंबा झाला आहे.
एकंदरीतच, इंद्रायणी घाटावरील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, दांडेकर स्मारकापाशी तर तारा स्मारकाच्या मेघडंबरीलाच चिकटल्या आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, या सर्वच बाबींकडे लक्ष देऊन वारीपूर्वीच वारकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
>दक्षिण घाटावरील विद्युत दिवे गायब
स्थानिक नागरिकही विरंगुळ्याकरिता रात्रीच्या वेळी घाटावर येत असतात. लहान मुलेही घाटावरील मोकळ्या जागेत खेळत असतात. अंधार असल्याने त्यांनाही धोकादायक स्थितीत खेळावे लागत आहे. दारू पिऊन झिंगलेल्या दारूड्यांचाही उपद्रव वाढला असून, सर्वसामान्य वारकऱ्यांना या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण घाटावर तर विद्युत दिवेच गायब झालेले असून, त्यामुळे परिसरात पूर्णपणे अंधार पसरला आहे.