दुसागुडातील तिघांचा गॅस्ट्रोने मृत्यू, उपचारकेंद्राअभावी पुजारी करत होते उपचार
By admin | Published: September 16, 2016 07:04 PM2016-09-16T19:04:08+5:302016-09-16T19:04:08+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र कसनूसरमधील पुन्नूर आरोग्य उपकेंद्राच्या हद्दीतील दुसागुडा या गावातील तीन जणांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला असून यामध्ये एका युवकाचा समावेश आहे
Next
>आरोग्य उपकेंद्र बंद : पुजाऱ्याने केले उपचार
ऑनलाइन लोकमत
रवी रामगुंडेवार, एटापल्ली (गडचिरोली), दि. 16 - प्राथमिक आरोग्य केंद्र कसनूसरमधील पुन्नूर आरोग्य उपकेंद्राच्या हद्दीतील दुसागुडा या गावातील तीन जणांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला असून यामध्ये एका युवकाचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुन्नूर आरोग्य केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने एकाही गावकऱ्यावर येथे वैद्यकीय उपचार होऊ शकला नाही.
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पुन्नूर हे आरोग्य उपकेंद्र आहे. या आरोग्य उपकेंद्राच्या हद्दीत दुसागुडा हे गाव येते. पुन्नूरपासून दुसागुडा हे गाव दोन किमी अंतरावर आहे. दुसागुडा या गावातील चंद्रा चन्नू पोटावी (२२) या युवकाला ९ सप्टेंबर रोजी अतिसार व उलटीचा त्रास सुरू झाला. त्याला दुसागुडापासून दोन किमी अंतरावरील पुन्नूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. हे उपकेंद्र बंद असल्याने जवळच असलेल्या पेठा गावातील पुजाऱ्याकडे त्याच्यावर उपचार करण्यात आला. दिवसभर पुजाऱ्याने उपचार केल्यावर हालेवारा येथील खासगी डॉक्टर पेठा गावात आले व पुजाऱ्याच्या घरी या डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले. परंतु चंद्रा पोटावी या युवकावर योग्य उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर १४ सप्टेंबरला महारू नरसू होळी (७०) व मादी चुकलू होळी (४५) हे आजारी पडलेत. १५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजता महारूचा तर दुपारी २ वाजता मादी चुकलू होळीचा मृत्यू झाला. दुसागुडा गावापासून कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्र आठ किमी अंतरावर तर पुन्नूर आरोग्य उपकेंद्र दोन किमी अंतरावर आहे. परंतु उपकेंद्र बंद असल्याने व कसनसूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे या साथीच्या रोगाकडे दुर्लक्ष झाल्याने तीन लोकांना गॅस्ट्रोमुळे आपला जीव गमवावा लागला.
पुन्नूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात पुजारी बिंदू पोटावी, सिंधू पुनहेटी या दोन महिलांसह काही बालकांवर आपल्या घरी उपचार करीत असल्याचे शुक्रवारी प्रतिनिधीने या भागाला भेट दिल्यानंतर दिसून आले. आरोग्य उपकेंद्रासमोरच हा पुजारी राहतो व सर्वांवर उपचार करीत आहे. सदर प्रतिनिधीने शुक्रवारी दुसागुडा गावाला भेट दिली असता, रानो रैणू दुग्गा (४०), महारी पांडू गोटा (४०), जुनकी रैनू कुळहेटी (३५), नानी राजू दोरपेटी (३५), बकली रावजी झुरे (३०), बाजू मासू होळी (४०) या सहा महिला गॅस्ट्रोने ग्रस्त असल्याचे दिसून आले. त्या आपापल्या घरीच खाटेवर झोपलेल्या होत्या. तिघाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा उशिरा कामाला लागली. प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डब्ल्यू. बन्सोड, घोटसूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर नैताम, पुन्नूर उपकेंद्राच्या परिचारिका एन. व्ही. उसेंडी यांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जि. प. शाळा दुसागुडा येथे १५ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिर लावले. डॉ. बन्सोड यांनी गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी व एटापल्लीचे तालुका अधिकारी यांना गुरूवारी रात्री या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, नागपूरचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डॉ. विश्वजीत भारतद्वाज, विस्तार अधिकारी व्ही. एम. सोमनकर, आरोग्य सहायक एस. डी. खोब्रागडे यांनी दुसागुडा गावाला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.
यासंदर्भात माहिती देताना प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डब्ल्यू. बन्सोड म्हणाले की, तिघाजणांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला. यापैकी महारू होळी व मादी होळी याच्यावर आरोग्य यंत्रणेच्या लोकांनी गावात जाऊन उपचार केले. अजूनही गावात गॅस्ट्रोची साथ असून साथ संपेपर्यंत विशेष शिबिर सुरूच राहणार आहे.