दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 06:00 AM2022-10-07T06:00:10+5:302022-10-07T06:01:56+5:30
दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळाव्यांवरून राजकीय घमासान सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/मुंबई: दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळाव्यांवरून राजकीय घमासान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचीच स्क्रिप्ट वापरली अशी टीका होत आहे. यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले. ही स्क्रिप्ट भाजपची होती असे म्हणणाऱ्यांनी त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलावा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण हे शिमगा होते आणि सुज्ञ लोक त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत, अशी शेलक्या भाषेत त्यांनी टीका केली.
पुण्यात ते म्हणाले, ‘बीकेसीवरील गर्दीतून शिंदे यांनी हे दाखवून दिले की खरी शिवसेना नेमकी कोणाची आहे. शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी तेथे होती. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शिमग्याच्या पलीकडे काहीच नव्हते. त्यावर सुज्ञ प्रतिक्रिया देत नाहीत.’
एकनाथ शिंदे हे विकासावर बोलले, पुढे सरकार म्हणून काय करणार आहोत याबाबत ते बोलले. मात्र, यापूर्वी उद्धव ठाकरे हे कधीही मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. ते पूर्णवेळ पक्षप्रमुख म्हणूनच बोलले, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. शिंदेंनी भाजपच्या स्क्रिप्टचेच वाचन केले. बंडखोरीचे पाप झाकण्यासाठी शिंदे व त्यांचे समर्थक वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांना ‘एक दुखावलेला बाप’ या नात्याने खा. श्रीकांत शिंदे यांनी लिहिले पत्र
दीड वर्षाच्या मुलावर हिणकस टीका कुटुंबप्रमुखाला शोभत नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
‘रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या लहानग्याचा उल्लेख तुम्ही ‘कार्ट’ असा केलात. कुटुंबप्रमुख म्हणवून घेणाऱ्याला हे शोभते का?’ ‘रुद्रांशचा नगरसेवकपदावर डोळा आहे,’ असे वक्तव्य तुम्ही कसे केलेत? ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ निर्मलता ओसंडून वाहते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागले आहेत, असे वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटले नाही?’
एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणे तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसते का? मुख्यमंत्री असताना स्वत:ला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवून घेणारा असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो का?, असा सवाल त्यांनी केला. तुमच्या या हीन व गलिच्छ टिप्पणीमुळे बाळाची आई व आजी दोघी कमालीच्या दुखावल्या. लहान मुलाविषयी एक राजकारणी असं कसं बोलू शकतो? हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.
ज्या परिवारासाठी आम्ही जिवाचं रान केलं, त्याच कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जर आमच्या चिमुकल्याबद्दल असे उद्गार काढत असेल, तर आमच्या मनाला किती वेदना होत असतील? तुम्हीही आजोबा व्हाल तेव्हा तुमच्या नातवाविषयी कुणी असे बोलले तर तुमची काय अवस्था होईल? राजकारण होत राहील. त्यात निरागसतेला ओढू नका. हे पाप कुठेही फेडता येणार नाही. - डॉ. श्रीकांत शिंदे, एक दुखावलेला बाप
काय म्हणाले होते ठाकरे?
बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठे तर होऊ द्या,सगळं माझ्याचकडे पाहिजे, असे विधान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"