Dasara Melava Update: ... तर भविष्यात परवानगी नाकारण्याचे कारण ठरेल; उच्च न्यायालयाची ठाकरेंना महत्वाची अट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:17 PM2022-09-23T17:17:25+5:302022-09-23T17:18:08+5:30
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेला दसरा मेळाव्यावेळी मोठी काळजी घ्यावी लागणार. नाहीतर पुढच्या वर्षी शिवाजी पार्क हातचे जाण्याची शक्यता.
खरी शिवसेना कोणाची यावर न बोलता अन्य गोष्टींवर मर्यादितच युक्तीवाद करा असे उच्च न्यायालयाने तिन्ही बाजुंना सांगत आज शिवाजी पार्कवर शिवसेनाचदसरा मेळावा घेणार असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. मात्र यासाठी उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला एक अट घातली, यात दोषी आढळले तर पुढच्या वेळी परवानगी नाकारण्यासाठी ते कारण ठरेल असाही इशारा न्यायालयाने दिला आहे.
उच्च न्यायालयाने पालिकेला तुम्हाला यापूर्वी असे अर्ज आले होते का? त्यावर त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेतलात असा सवाल न्यायालयाने केला. यावर पालिकेने २०१७ मध्ये असा प्रसंग आला होता, तेव्हा दोन्ही गटांमध्ये परस्पर समजुतीने दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती. परंतू आता परिस्थिती वेगळी आहे. हे प्रकरण समजुतीने सोडविण्यासारखे नाहीय, असा युक्तीवाद पालिकेने केला. यावर पालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला.
ठाकरे गटाला शिवतिर्थावर मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत आम्हीच खरी शिवसेना आहोत, यामुळे शिवाजी पार्कची जागा आम्हाला मिळायला हवी अशी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने शिवसेना नेमकी कोणाची हा विषयच नसल्याचे म्हणत ही याचिका फेटाळण्यात आली.
तसेच न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय. सरकारने ४५ दिवस अशा कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेले आहेत, अशी टिप्पणी केली. यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. पोलीस व्हिडीओ शुटींग करतील. काही घटना घडली आणि याचिकाकर्ते कोणत्याही घटनेला जबाबदार असल्याचे आढळले तर भविष्यात त्यांना तिथे दसरा मेळावा नाकारण्याचे कारण ठरू शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.