मृत्यूच्या कुशीत दशरथनगर !
By Admin | Published: August 5, 2014 01:09 AM2014-08-05T01:09:11+5:302014-08-05T01:09:11+5:30
पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे.
भूस्खलनाचा धोका माळीण होणार का? नागरिकांचा जीव मुठीत
आनंद डेकाटे/ जीवन रामावत -नागपूर
पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे. पहाडाच्या लागून वसलेले माळीण हे राज्यातील किंवा देशातील एकमेव गाव नव्हे तर अशी अनेक गावे आजही धोकादायक स्थितीत आहेत. नागपूर शहरातसुद्धा अशा काही वस्त्या आहेत ज्या पहाडाखाली, पहाडाला लागून वसल्या आहेत. लोकमत चमुने सोमवारी या वस्त्यांची पाहणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गिट्टीखदान परिसरातील दशरथनगर व कुतुबशहानगर या अशाच धोकादायक वस्त्या असून यांचे कधी ‘माळीण’ होईल, काही सांगता येत नाही.
छतावरचे प्लॅस्टरही तुटून पडले
दशरथनगरात टेकडीवरून दगड पडणे नवीन नाही. एकदा टेकडीवरून एक मोठा दगड कोसळून लोखंडे यांच्या घरावर पडला. त्यामुळे सिमेटंच्या छताचे प्लॅस्टर तुटून त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या ओट्यावर पडल्याने ते तुटले. आजही तुटलेले प्लॅस्टर तसेच आहे.
तरुण मुलाचा गेला जीव
दशरथनगर येथे राहणारे कांता तायडे यांचा १८ वर्षाचा तरुण मुलगा महेश हा एकेदिवशी पतंग उडविण्यासाठी घरामागच्या टेकडीवर चढला. पतंग उडविताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याची आठवण सांगताना त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यात आजही अश्रू दाटून येतात.
शौचालयाचे छप्पर तुटले
दगड नेहमीच पडत असतात परंतु येथील शाहू यांच्या घरावर एक मोठा दगड पडल्याने त्यांचे छप्पर तुटले. रात्री ११ वाजताच्या सुमारास धो धो पाऊस पडत असताना अचानक दगड पडला. तेव्हा मोठा आवाज झाला. आकाश कोसळले की काय असे वाटू लागले. त्या घटनेपासून शाहू कुटुंबीय पावसाळा आला की दहशतीतच असतात.
वर दरड तर खाली दलदल
दशरथनगरातील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. वरून दरड कोसळण्याची भीती आहे तर खाली वस्तीत दलदल आहे. एकेकाळी येथे एक छोटे सरोवर होते. पहाडावरून वाहत येणारे पाणी येथे साचायचे. आज सरोवराच्या आजूबाजूला घरे झाली आहेत. वरच्या पाण्यासोबतच नागरिकांच्या वापराचे पाणीही सरोवरात सोडले गेले. परिणामी सरोवर दूषित झाले. आज या सरोवरात गवत वापले असून दलदल तयार झाली आहे. खेळता खेळता त्यात कुणी पडले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.