‘दशक्रिया’ने मारली तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर बाजी
By admin | Published: April 7, 2017 06:03 PM2017-04-07T18:03:59+5:302017-04-07T18:03:59+5:30
जेष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरून यंदाही राष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा बोलबाला
Next
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 07 - जेष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरून यंदाही राष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा बोलबाला कायम ठेवला. ‘माझ्या शब्दांना चंदेरी पडद्यावर दृष्यस्वरुपात साकारल्यानंतर तिचा एवढ्या मोठ्या सन्मानाने गौरव होताना पाहुन खूप आनंद वाटतोय, अशी प्रतिक्रिया बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
मराठी भाषेतील सर्वाेत्कृष्ट चित्रपट, मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेता तर संजय कृष्णाजी पाटील यांना पूर्वप्रकाशित साहित्यावर आधारित सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार शुक्रवारी (दि. ७) जाहीर झाला. ‘दशक्रिया’सारख्या एवढ्या नावजलेल्या कादंबरीला मोठ्या पद्यावर साकारण्याचे मोठे आव्हान होते. या पुरस्कारांनी ते आव्हान यशस्वीरीत्या पेलले याची खात्री पटली, अशा शब्दांत दिग्दर्शक संदीप पाटील यांनी आनंद व्यक्त केला. त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता.
दोन दशकांहून अधिक काळ लोटला तरी ‘दशक्रिया’ची लोकप्रियता टिकून आहे. पैठणच्या घाटावर दशक्रिया विधीवर उपजिवीका भागवणा-या भानुदास म्हणजेच भान्याची ही गोष्ट. दहा-बारा वर्षांच्या या मुलाच्या निरागस डोळ्यांतून समाजात असलेल्या जाती-परंपरा-रुढींचे केलेले अचूक टीपण यामध्ये नोंदविण्यात आले आहे. कादंबरीला वाचक आणि समीक्षकांनी प्रेम दिले. अनेक पुरस्कारही मिळाले. आता तिच्यावर आधारित सिनेमाने राष्ट्रीय पातळीवर विजयी पताका रोवली.
चित्रपटात दिलीप प्रभावळकर,आदिती देशपांडे, मिलिंद शिंद, नंदकिशोर चौघुले या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. आर्या आढाव हा बालकलाकार ‘भान्या’च्या मुख्य भूमिकेत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) ‘दशक्रिया’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता.
‘लोकमत’ कनेक्शन
१९९४ साली ‘लोकमत’च्या रविवार पुरवणीतून बाबा भांड लिखित ‘दशक्रिया घाटावरची मुलं’ ही गोष्ट क्रमाक्रमाने प्रकाशित झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे १९९५ साली त्यांनी या किशोर कथेला कादंबरीचे स्वरुप देऊन ‘दशक्रिया’ नावाने प्रकाशित केले.
माझी पात्रं जिवंत झाली!
लेखक म्हणून शब्दबद्ध केलेली पात्रे पटकथाकार, दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांनी अतिशय संवेदनशीलपणे साकारून त्यांना जिवंत केले. त्यावर सर्व कलाकारांनी जणूकाही परकाया प्रवेश करून सर्व भूमिका केल्या. जेव्हा प्रथम हा चित्रपट पाहिला तेव्हा इतकी वर्षं केवळ शब्दरुपी असणारी ही लोकं आज माझ्यासमोर चालू-बोलू लागली होती. आपण जन्म दिलेली कलाकृती वेगळ्या स्वरुपात पाहून खूपच आनंद झाला. तसेच आपल्या कलाकृतीला योग्य तो न्याय मिळाला याचे समाधान तर आहेच.
- बाबा भांड, जेष्ठ साहित्यिक़
स्वप्नवत सुरूवात
माझ्या पहिल्याच प्रयत्नाला एवढे मोठे यश लाभले याचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. विविध महोत्सावांमध्ये प्रेक्षकांनी तर पसंतीची पावती दिलीच होती. आता त्यावर राष्ट्रीय पुरस्कारांची मोहर उमटली. नवदिग्दर्शकासाठी यापेक्षा मोठी सुरूवात दुसरी काय असू शकते? बाबा भांड यांनी माझ्यावर विश्वास दाखखवून ‘दशक्रिया’वर चित्रपट बनविण्याची संधी दिली. संपूर्ण टीमचे हे यश आहे.
- संदीप पाटील, दिग्दर्शक.
निर्णय सत्कारणी लागला
पटकथा वाचल्यानंतर आपण ‘केशव भटां’ची भूमिका करावी हा निर्णय घेतला. आज तो निर्णय सत्कारणी लागला असेच म्हणावे लागेल. प्रत्येक अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न पाहत असतो आणि तो मला ‘दशक्रिया’च्या रुपाने एका मराठी चित्रपटासाठी मिळाला याचा खूप आनंद आहे. हा माझा गौरव आहे की, मी ही भूमिका साकारली.
- मनोज जोशी, अभिनेते.
सामाजिक विषयाला पसंती
‘जोगवा’नंतर आम्हाला सामाजिक विषयावर चित्रपट करावा असे ठरवले होते. काही तरी वेगळे आणि नेहमीपेक्षा हटके विषय घेऊन चित्रपट काढावा या प्रेरणेतून ‘दशक्रिया’ साकार झाला. त्याला रसिकप्रेक्षकांनी प्रेम दिल्यानंतर आता राजमान्यता मिळाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचा हेतू सफल झाला असे आता मी मानतो.
- संजय कृष्णाजी पाटील, पटकथा लेखक.