दर्शना पवारचा मृत्यू दगड मारल्यानेच
By admin | Published: February 25, 2015 02:27 AM2015-02-25T02:27:49+5:302015-02-25T02:27:49+5:30
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून दर्शना पवार या तरुणीचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता.
डोंबिवली : अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून दर्शना पवार या तरुणीचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. चोरीच्या उद्देशानेच धावत्या लोकलवर दगड मारल्याने ती पडली, आणि त्यानंतर तिच्या पर्समधील मोबाइल आणि पैसे काढून घेण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दर्शनाचा भाऊ सचिन पवार याने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीत तिच्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अंबरनाथ येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या रतन मारवाडी (४५) ऊर्फ भाग्या यास मंगळवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास अटक केली.
दर्शना सोमवारी (९ फेब्रुवारी) ठाण्याहून ७.२0 च्या बदलापूर लोकलने घरी येत होती. ज्या लोकलने ती प्रवास करीत होती, ती लोकल अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान आल्यावर दर्शना दगड लागून पोल नं. ६२/७ जवळ पडली. त्यानंतर भाग्याने तिच्याजवळील मोबाइलसह अन्य ऐवज लंपास केला. चौकशीत भाग्याने दगड मारल्याचे आणि चोरी केल्याचे मान्य केले आहे. त्यास अटक करण्यात आली असून बुधवारी त्यास कोर्टात हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)