मिस्त्रींच्या गाडीतील डेटा जर्मनीला पाठवणार; तपासासाठी कार कासा पोलिसांच्या ताब्यात
By ओमकार संकपाळ | Published: September 8, 2022 08:46 AM2022-09-08T08:46:55+5:302022-09-08T08:48:19+5:30
उद्योगपती मिस्त्री यांना गाडीची एअरबॅग वाचवू शकली असती का, ती कोणत्या बिघाडामुळे उघडली नाही, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मर्सिडिझ मोटार उत्पादकांना काही प्रश्न विचारले आहेत.
कासा : उद्योगपती सायरस मिस्त्री यांची अपघातग्रस्त गाडी कासा पोलिसांनी ताब्यात घेतली असून, अपघाताची यंत्रणांकडून चौकशी सुरूच आहे. दरम्यान, गाडीच्या चीपचा डेटा जर्मनीत पाठविला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
उद्योगपती मिस्त्री यांना गाडीची एअरबॅग वाचवू शकली असती का, ती कोणत्या बिघाडामुळे उघडली नाही, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मर्सिडिझ मोटार उत्पादकांना काही प्रश्न विचारले आहेत. अपघाताची चौकशी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना आपण सर्व ते सहकार्य करत आहोत व आवश्यक ती सर्व माहिती आम्ही पुरवू, असे मर्सिडिझ बेंझ कंपनीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एअरबॅग का उघडली नाही?, मोटारीत काही तांत्रिक बिघाड होता का?, गाडीचे ब्रेक फ्लुइड किती होते?, टायरचे प्रेशर किती होते?, अपघात झाल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाले होते का? असे काही प्रश्न मर्सिडीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी उपस्थित केले आहेत तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण, गाडीचा ठावठिकाणा यांचा संबंध जोडल्यास त्यांनी ९ मिनिटांत २० किमीचे अंतर पार केले.
गाडी हलविली
चारोटी उड्डाणपुलाजवळ असलेली अपघातग्रस्त गाडी बुधवारी कासा पोलीस ठाण्याजवळ सुरक्षेच्या कारणास्तव हलविण्यात आली आहे, असे कासा पोलिसांनी सांगितले.
मर्सिडीज कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहनाची माहिती गोळा केली असून हा संपूर्ण डेटा आता डिकोड करावा लागणार आहे. हा डेटा डिकोड करण्याचे तंत्रज्ञान हे मर्सिडीजच्या जर्मनी येथील प्लँटमध्ये उपलब्ध असल्याने हा डेटा जर्मनीला पाठविला जाणार आहे.
डेटा डिकोड झाल्यानंतरच वाहनाचा वेग इतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असे सांगण्यात आले.