शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख पे तारीख, आता आमदार शिरसाटांनी सांगितला नवा मुहुर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:00 PM2022-07-18T16:00:19+5:302022-07-18T16:01:37+5:30
Shinde Government's Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारखांवर तारखा शिंदे गटाकडून दिल्या जात आहेत. दरम्यान, शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे सरकारच्या विस्ताराची अजून एक नवी तारीख जाहीर केली आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र तेव्हापासून आतापर्यंत राज्याती मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. आधी बहुमत सिद्ध केल्यावर, नंतर ११ जुलैला होणाऱ्या सुप्रिम कोर्टातील सुनावणीनंतर, मग राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी अशा तारखांवर तारखा शिंदे गटाकडून दिल्या जात आहेत. दरम्यान, शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे सरकारच्या विस्ताराची अजून एक नवी तारीख जाहीर केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २० जुलैनंतर होऊ शकतो, असे सुतोवाच संजय शिरसाट यांनी केले आहे. ते म्हणाले की, शिंदे सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार हा एक दोन दिवसांत होणार होता.परंतु २० जुलै रोजी सुप्रिम कोर्टात सुनावणीची तारीख लागली आहे. आता सुप्रिम कोर्टात सुनावणी असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करतोय, हे चित्र बरोबर दिसलं नसतं, असं वरिष्ठ नेत्यांना वाटलं. त्यामुळे ही सुनावणी झाल्यानंतर २० तारखेनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मला वाटतं.
दरम्यान, सरकार येऊन २० दिवस होत आले तरी कॅबिनेटचा विस्तार झालेला नसल्याने आमदारांमध्ये असंतोष, नाराजी आहे का असं विचारलं असता आमदार संजय शिरसाठ म्हणाले की, आमच्या गटामध्ये कुठलीही नाराजी नाही. एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही तर नाराजी होते. मात्र परंतु आमच्यात मंत्रिपदासाठी नाराजी नाहीच आहे. याला मंत्री केलं, त्याला मंत्री केलं, हा नाराज, तो नाराज असला विषय आमच्यात नाही आहे. त्यांनी सर्वांना सामावून घेऊ, असं सांगितलंय. त्यामुळे ते सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने सामावून घेतील, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
तसेच आज होणाऱ्या शिंदे गटाच्या बैठकीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, आजची बैठक ही कोर्टाच्या सुनावणी संदर्भात महत्त्वाचे निर्यण आम्हाला घ्याचे आहे. त्यासंदर्भात केवळ शिवसेनेच्या आमदारांसाठी ही बैठक बोलावली आहे, असे ते म्हणाले.