दत्ता पडसलगीकर होणार मुंबईचे पोलीस आयुक्त

By admin | Published: January 15, 2016 04:24 AM2016-01-15T04:24:35+5:302016-01-15T04:24:35+5:30

सध्या केंद्र सरकारच्या सेवेत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) नियुक्तीवर असलेले भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांना गुरुवारी त्यांच्या मूळ महाराष्ट्र

Datta Pansalgekar will be the Mumbai Police Commissioner | दत्ता पडसलगीकर होणार मुंबईचे पोलीस आयुक्त

दत्ता पडसलगीकर होणार मुंबईचे पोलीस आयुक्त

Next

मुंबई : सध्या केंद्र सरकारच्या सेवेत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) नियुक्तीवर असलेले भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांना गुरुवारी त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये परत पाठविण्यात आल्याने पडसलगीकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होतील, हे निश्चित झाले. यासंदर्भात गृह मंत्रालयातील कोणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नसले तरी पडसलगीकर लवकरच विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारतील, असे माहीतगार सूत्रांकडून समजते. अहमद जावेद यांची सौदी अरेबियात भारतीय राजदूतपदी नियुक्ती झाली आहे. पडसलगीकर यांची नियुक्ती झाली तर तब्बल ९ वर्षांनी मराठी व्यक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी येईल. याआधी वर्ष २००७मध्ये डी.एन. जाधव हे मराठी पोलीस आयुक्त झाले होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जा असलेले पडसलगीकर ‘आयबी’मध्ये विशेष संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर होते. आयुक्तपदी नियुक्ती करताना त्यांना महासंचालक पदाच्या दर्जावर बढती दिली जाईल. पडसलगीकर आॅगस्ट २०१८मध्ये सेवानिवृत्त होणार असल्यामुळे त्यांना मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पूर्ण कालावधी मिळणार आहे.
दत्तात्रय पडसलगीकर हे आज (गुरुवार) महाराष्ट्र केडरमध्ये पुन्हा रुजू झाल्याच्या वृत्ताला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांनी दुजोरा दिला. ते मुंबईचे पोलीस आयुक्त बनणार का, या प्रश्नावर बक्षी म्हणाले की, ‘‘त्याबद्दल मी बोलणे योग्य ठरणार नाही. अहमद जावेद हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत; परंतु केंद्र सरकारने विनंती केल्यास त्यांना जबाबदारीतून मोकळे केले जाईल, असेही बक्षी म्हणाले. ते बहुधा त्यांना उद्याच मोकळे करण्याची विनंती करू शकतात. तसा आदेश आम्हाला मिळताच नवे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करायची याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.’’
पडसलगीकर यांचे महाराष्ट्रात परत येणे ही अपवादात्मक बाब आहे. गुप्तचर खात्यात असा अलिखित नियम आहे की आयबीने ज्या अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्यांना प्रदीर्घ काळ सामावून घेतले आहे त्यांना राज्याचे पोलीस महासंचालक (कोणत्याही राज्यात पोलीस महासंचालक ही खूपच वरची जागा आहे) केले जाणार असेल तरच त्या अधिकाऱ्याला परत पाठविले जाते. मुख्यमंत्री फडणवीस हे पडसलगीकरांना आयबीतून महासंचालक पदावर घेण्यास यशस्वी ठरले आहेत, असे या सूत्रांनी सांगितले. प्रामाणिक व सचोटीचे अधिकारी म्हणून परिचित असलेले पडसलगीकर मूळचे सोलापूरचे. त्यांची प्रतिमा स्वच्छ असून, काम करून घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री होताच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी पहिली पसंती पडसलगीकरांनाच होती; परंतु त्यांनीच ती नम्रपणे नाकारली व राकेश मारिया त्या पदावर कायम राहिले. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पडसलगीकरांचा गुप्तचर खात्यातील अनुभव मुंबईसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: Datta Pansalgekar will be the Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.