दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली पोलीस महासंचालकपदाची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:08 PM2018-06-30T18:08:51+5:302018-06-30T18:27:05+5:30

सतीश माथूर यांच्या निवृत्तीनंतर दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली जबाबदारी

Datta Pansalgikar took charge as Director General of Police | दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली पोलीस महासंचालकपदाची धुरा

दत्ता पडसलगीकर यांनी स्वीकारली पोलीस महासंचालकपदाची धुरा

Next

मुंबई - दत्ता पडसलगीकर यांनी  राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आज पदभार स्वीकारला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे आज आपल्या ३७ वर्षांच्या आयपीएस सेवेनंतर निवृत्त होत असून त्यांच्या जागी सध्या पोलीस सेवेत सर्वात ज्येष्ठ असलेले मुंबईचे दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती झाली आहे. पडसलगीकर यांच्या जागी स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे ४१वे पोलीस आयुक्त म्हणून सुबोधकुमार जयस्वाल यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

येत्या ३१ ऑगस्ट रोजी दत्ता पडसलगीकर हे देखील सेवाज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, पडसलगीकर यांनी गेली ३६ वर्षे केलेली निष्कलंक सेवा व मुंबईची वाहिलेली यशस्वी धुरा पाहता या प्रामाणिक अधिकाऱ्याला राज्य व केंद्र शासन ऑगस्टनंतर सहा महिने मुदतवाढ देणार आहे अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मुंबईचे आयुक्तपद व पोलीस महासंचालकपद रिक्त होणार असल्याने ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परमवीर सिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ठाण्यात केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी फेब्रुवारी महिन्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्याचे महासंचालक म्हणून अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय बर्वे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. संजय बर्वे हेही पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.

Web Title: Datta Pansalgikar took charge as Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.