दत्तात्रय पडसलगीकरांनी स्वीकारली मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे
By admin | Published: January 31, 2016 12:55 PM2016-01-31T12:55:56+5:302016-01-31T12:56:29+5:30
दत्तात्रय पडसलगीकर यांनी रविवारी दुपारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - दत्तात्रेय पडसलगीकर यांनी आज दुपारी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पडसलगीकर दुपारी १२ च्या सुमारास आयुक्तालयात दाखल झाले असता त्यांना मानवंदना देण्यात आली व त्यानंतर त्यांनी मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.
पडसलगीकर यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुंबई पोलीस आयुक्तपदाचा दर्जा अवनत करून, पूर्वीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा केला असून शनिवारी तसे आदेश जारी करण्यात आले. मुंबईचे पोलीस आयुक्तपद नेहमीच अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राहिले आहे. मात्र, अहमद जावेद यांना सामावून घेता यावे, यासाठी गेल्या वर्षी दर्जा वाढवून ते पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले होते. जावेद अहमद हे आधीच पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी होते. त्यांना कमी दर्जाच्या पदावर नियुक्त करता येत नसल्यामुळे पदाचा दर्जा वाढविण्यात आला होता. जावेद अहमद यांच्यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्तपद राकेश मारिया यांच्याकडे होते. मात्र, नियोजित पदोन्नतीच्या २२ दिवस आधीच मारियांना पदोन्नती देत, त्यांची बदली करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
कोण आहेत दत्तात्रय पडसलगीकर ?
मूळचे सोलापूरचे रहिवासी असलेले पडसलगीकर यांची प्रतिमा स्वच्छ आहे. १९८२ च्या तुकडीचे अधिकारी असलेले पडसलीकर एक टास्क मास्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खरे तर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांनाच मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यास इच्छुक होते. मात्र, पडसलगीकर यांनी विनम्रपणे त्यांची विनंती नाकारली होती आणि राकेश मारिया यांना आयुक्त म्हणून कायम ठेवावे, असे त्यांना सांगितले होते. ते आयबीमध्ये दहशतवादविरोधी पथकात सक्रीय होते. त्यांचा तो अनुभव मुंबई पोलिसांना चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. नव्वदीच्या दशकात त्यांनी गुन्हे शाखेत उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे मुंबईचे गुन्हेगारी जगत त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या रूपाने ९ वर्षांनंतर मुंबईला एक महाराष्ट्रीय पोलीस आयुक्त मिळाला आहे. यापूर्वी डी.एन. जाधव यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.