दत्तवाडमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त
By Admin | Published: July 11, 2015 12:37 AM2015-07-11T00:37:35+5:302015-07-11T01:37:53+5:30
चौघे ताब्यात : मिरजेत ३४ लाखांच्या नोटा जप्त; सांगली पोलिसांची कारवाई
सांगली/कुरुंदवाड : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिरजेत सुमारे ३४ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा छपाईचा कारखाना दत्तवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे असल्याचे समजताच पथकाने लागलीच तेथेही छापा टाकला. तेथून स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स यंत्र, कटिंग यंत्र व कागदी बंडल जप्त केले. नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या दत्तवाडमधील बाप-लेकासह चौघांच्या टोळीस ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
रमेश कृष्णा घोरपडे, ऐनुद्दीन गुलाब ढालाईत, इम्रान ऐनुद्दीन ढालाईत व सुभाष शिवलिंग पाटील-सोळकुडे (सर्व रा. दत्तवाड) यांचा समावेश आहे.
ऐनुद्दीन ढालाईत शुक्रवारी सायंकाळी मिरजेतील स्टेशन रस्त्यावरील हैदराबाद बँकसमोर एकाला बनावट नोटा खपविण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने बँकेजवळ सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित ढालाईत आला. त्याच्या हातात बॅग होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक पुढे गेले. पोलीस असल्याची चाहूल लागताच त्याने बॅग टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच त्याला पकडले. बॅगेची झडती घेतल्यानंतर यामध्ये सुमारे ३४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व नोटा एक हजाराच्या आहेत. ढालाईतची कसून चौकशी केल्यानंतर त्याने नोटा छपाईचा कारखाना दत्तवाडमध्ये रमेश घोरपडे याच्या घरात असल्याचे सांगितले.
पथकाने संशयित ढालाईत यास घेऊन दत्तवाड गाठले. रमेश घोरपडे याच्या कौलारू घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत, सुभाष पाटील हे तिघेही चौघे नोटांची छपाई करताना रंगेहात सापडले. येथे नोटा छपाईसाठी वापरण्यात आलेले स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स यंत्र व नोटांची छपाई केल्यानंतर कटिंग करण्यासाठी ठेवलेले यंत्र सापडल्याने ही सर्व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. कोऱ्या कागदांचे बंडल व तसेच नोटांच्या आकाराचे कापून ठेवलेले बंडलही मोठ्या प्रमाणात सापडले. मात्र छपाई केलेली एकही नोट तेथे सापडली नसल्याचे निरीक्षक घनवट यांनी सांगितले. अन्य तिघा संशयितांच्या घरावर छापे टाकून पथकाने झडती घेतली. मात्र, काहीही संशयास्पद सापडले नाही.
जप्त करण्यात आलेल्या यंत्रसामग्रीपैकी नोटा छपाईचे कटिंग यंत्र वजनाने प्रचंड आहे. ते पोलिसांनी मालवाहू वाहनातून आणले. ते उतरून घेण्यासाठी दहा ते पंधरा पोलिसांची मदत घ्यावी लागली. रंगीत झेराक्स यंत्रही आकाराने मोठे असल्याने तेही मालूवाहू रिक्षातून आणण्यात आले.
बँकेतही बनावट नोटा
याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक राजन मल्हारी चव्हाण यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मे महिन्यात युनियन बँकेकडून चार जिल्ह्यांतील बँकांकडून आलेली ७ कोटी २१ लाख रुपये रक्कम रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर कार्यालयात पाठविली होती. यापैकी हजार, पाचशे रूपयाच्या दोन व शंभराच्या सहा अशा ३६00 किमतीच्या नोटा सापडल्या.
पथक कर्नाटकात
ताब्यात घेतलेल्या संशयितांचे बनावट नोटा चलनात आणण्यासाठी कर्नाटकात ‘कनेक्शन’ असल्याची माहिती मिळाल्याने पथक रात्रीच कर्नाटकात रवाना झाले आहे. तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. संशयितांना शनिवारी सकाळी अटक करून दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. ते कधीपासून नोटांची छपाई करतात, आतापर्यंत त्यांनी कोठे-कोठे चलनात आणल्या, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे निरीक्षक घनवट यांनी सांगितले.
ग्रामपंचायत उमेदवाराचा समावेश
ऐनुद्दीन ढालाईत याने दत्तवाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग तीनमधून अर्ज भरला आहे. त्याने प्रचारही सुरू केला होता. शुक्रवारी दुपारी प्रचारादरम्यान त्याने अनेकांना ‘तुमची घरपट्टी व पाणीपट्टी मी स्वत: भरतो, पण मला निवडून द्या’, असे आवाहन केले होते. त्यानंतर तो नोटा घेऊन त्या खपविण्यासाठी मिरजेतला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याचा भेळ विक्रीचा व्यवसाय असल्याचे समजते.
छोट्या घरात नोटांची छपाई
गावातील भरवस्तीत छोट्याशा घरात या नोटांची छपाई केली जात होती. स्टेशनरीच्या उत्पादनाचे काम करीत असल्याचे नागरिकांना भासवत असे. त्यामुळे ग्रामस्थ याकडे लक्ष देत नसत. पोलिसांच्या या कारवाईने ग्रामस्थांना सत्य माहिती पुढे आली असून, बऱ्याच दिवसांपासून ही छपाई होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आरोपींची स्थिती बेताची
बनावट नोटा प्रकरणातील संशयित आरोपी चौघेही एकमेकांचे कट्टर मित्र आहेत. सर्वांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच आहे. रमेश दुसऱ्याची शेती करतो, सुभाष शेतकरी आहे, तर ऐनुद्दीन व इम्रान हे पितापुत्र असून, भेळगाडी चालवितात.