कोल्हापूरची कन्या बांगलादेशची पाहुणी
By Admin | Published: January 28, 2016 12:34 AM2016-01-28T00:34:36+5:302016-01-28T00:35:36+5:30
‘युथएक्स्चेंज’ कार्यक्रमांतर्गत दौरा : आवळी (बु.) गावची मानही अभिमानाने उंचावली
मुरलीधर कुलकर्णी -- कोल्हापूर -लहान असतानाच तिनं लष्करात अधिकारी व्हायचं ठरवलं आणि म्हणूनच इयत्ता आठवीत आल्याबरोबर तिनं एनसीसीत प्रवेश मिळवला. दहावीचा टप्पा ओलांडून कॉलेजमध्ये आल्यानंतरही तिनं अगदी हट्टानं एनसीसी सोडलं नाही. परेड, हॉर्सरायडिंग, अडथळ्यांची शर्यत यांची गोडी वाढत गेली अन् एनसीसीच्या या शिक्षणानंच तिला युथएक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत बांगलादेशातील कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळवून दिला. ऋतुजा विलास कवडे असं या कोल्हापूरच्या कन्येचं नाव आहे. कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्समध्ये बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्गात सध्या ती शिकत आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यातील युथएक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत बांगलादेशचा जवळपास दोन आठवड्यांचा यशस्वी दौरा करून नुकतीच ती परतलीय. या दौऱ्यासाठी संपूर्ण देशातून १0 मुले आणि १0 मुली निवडण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील तिघांमध्ये ऋतुजाचा समावेश होता.
राधानगरी तालुक्यातील आवळी (बु.) या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या या मुलीला बांगलादेशच्या १६ डिसेंबरला झालेल्या विजय दिवसासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. जगभरातील विविध देशांतून आलेल्या युवकांसोबत ऋतुजाला आपल्या विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी तेथे मिळाली.
या विशेष पाहुण्यांसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी ढाक्याच्या बांगो भवनात खास मेजवानीचे आयोजन केले होते. विजय दिवसाच्या मुख्य कार्यक्रमानंतर १९७१ च्या बांगलामुक्तीच्या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय सैनिकांबरोबरच विविध देशांतून आलेल्या या युवकांचाही सत्कार करण्यात आला.
यानंतर या युवकांचा जवळपास दोन आठवड्यांचा बांगलादेश दौरा सुरू झाला. या काळात त्या देशातील लोकांचे राहणीमान, सण, समारंभ, तिथल्या लोकांच्या विविध समस्या ऋतुजाने आपल्या विविध मित्रांसमवेत जाणून घेतल्या. बांगलादेशातील विविध ऐतिहासिक स्थळांनाही तिने भेट दिली. बांगलादेशच्या लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी या काळात त्यांच्यासोबत होते. बांगलादेशचा दोन आठवड्यांचा दौरा आटोपल्यानंतर लगेचच ती चेन्नईत आॅफिसर्स ट्रेनिंग कॅम्पलाही जाऊन आली.
२५ वर्षांनंतर कोल्हापूरला संधी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘युथएक्स्चेंज’ कार्यक्रमांतर्गत दौऱ्यासाठी एखाद्या मुलीची निवड होण्याचा बहुमान ऋतुजाच्या रूपाने कोल्हापूरला तब्बल २५ वर्षांंनंतर मिळाला. यापूर्वी १९८९-९0 मध्ये वैशाली महाजन हिला हा बहुमान मिळाला होता.
२८ जानेवारी २0१४ रोजी नवी दिल्लीत झालेली प्राईमिनिस्टर्स रॅली व २0१५ रोजी २६ जानेवारीला राजपथावर झालेल्या शानदार संचलनामध्ये तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. २0१४ मध्ये लक्षद्वीप येथे झालेल्या स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पमध्येही तिने राज्याचे प्रतिनिधित्व केले.