गुप्तांग खाजवले म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 06:59 PM2017-08-11T18:59:40+5:302017-08-11T19:03:53+5:30
प्रविणचा वडिलांची हत्या करायचा हेतू नव्हता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात प्रविणची आई आणि बहिणीने त्याच्या विरोधात साक्ष दिली.
मुंबई, दि. 11 - वडिलांनी गुप्तांग खाजविले म्हणून संतापलेल्या मुलाने 79 वर्षीय वृद्ध वडिलांची हत्या केल्याची घटना 2012 मध्ये मुंबईत घडली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपी प्रविण कडूला कमी शिक्षा होईल अशा सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून सातवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
प्रविणचा वडिलांची हत्या करायचा हेतू नव्हता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात प्रविणची आई आणि बहिणीने त्याच्या विरोधात साक्ष दिली. 42 वर्षीय प्रविण मद्यपान करुन आल्यावर आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास द्यायचा. प्रवीणची आई प्रतिभाने एमएचबी पोलीस स्थानकात त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आपला मुलगा बेरोजगार असून दारुपिऊन आपल्याला, वडिलांना आणि बहिणींना त्रास देतो अशी तक्रार प्रतिभा यांनी केली होती.
प्रतिभा यांनी कोर्टासमोर साक्ष देताना सांगितले की, 22 डिसेंबर 2012 च्या रात्री आठच्या सुमारास प्रविण घरी दारु पिऊन आला व त्याने वडिल प्रभाकर कडू यांना शिवीगाळ सुरु केली. वडिलांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी दोघांचे भांडण सुरु असताना वडिलांनी त्यांचे गुप्तांग खाजवले म्हणून संतापलेल्या प्रविणने कपडे धुण्याचे धुपाटणे त्यांच्या डोक्यात मारले. लाकडी धुपाटण्याच्या जोरदार आघाताने वडिल रक्ताच्या थारोळयात बिछान्यावर कोसळले.
प्रविण त्यानंतर तिथून पळून गेला. सुरुवातीला त्यांना पोलिसात तक्रार नोंदवायला भिती वाटली. पण जेव्हा प्रभाकर कडू यांची प्रकृती ढासळली तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. प्रभाकर कडू यांचा त्याचदिवशी मृत्यू झाला. त्यानंतर प्रविण विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर कोर्टात खटला उभा राहिल्यानंतर न्यायालयाने सातवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.