डाळींसाठी लातुरात ७ ठिकाणी धाडी
By admin | Published: July 27, 2016 06:54 PM2016-07-27T18:54:27+5:302016-07-27T18:54:27+5:30
शासनाने दिलेल्या वेअरहाऊस व मिलमध्ये अपेक्षित माल आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी लातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या
पथकाची कारवाई : पाच वेअरहाऊस व दोन डाळ मिलची तपासणी
लातूर : शासनाने दिलेल्या वेअरहाऊस व मिलमध्ये अपेक्षित माल आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी लातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या पथकाने बुधवारी पाच वेअरहाऊस व दोन डाळ मिलवर धाड टाकून उपलब्ध मालाची तपासणी केली.
शासनाने २०१० मध्ये सूचित केलेल्या साठवण क्षमतेपर्यंत वेअरहाऊस व डाळ मिलमध्ये मालाची उपलब्धता आहे की नाही, हे पाहण्यासाठी बुधवारी नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या पाच जणांच्या पथकाने सकाळी ९ ते १२ या कालावधीत अचानक वेअरहाऊस व डाळ मिलवर धाड टाकून पाहणी केली. यामध्ये शहरातील कव्हा रोड भागातील माऊली कोल्ड अँड वेअरहाऊसच्या तीन व बुलडाणा अर्बन बँकेच्या नवीन एमआयडीसी भागातील दोन वेअरहाऊसची पाहणी केली तसेच जुन्या एमआयडीसी भागातील कीर्ती डाळ उद्योगची एक डाळ मिल व अमित अॅग्रो इंडस्ट्रिजची एक अशा दोन डाळ मिलची पाहणी करून तेथे उपलब्ध असलेल्या मालाची पाहणी केली. या अचानक केलेल्या पाहणीमुळे अनेक वेअरहाऊस व डाळ मिल धारकांचे धाबे दणाणले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार कारवाई
शासनाच्या सूचनेनुसार वेअरहाऊस व डाळ मिल धारकांकडे मालाचा साठा मर्यादित राहावा यासाठी तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार लातूर तहसील अंतर्गत चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नायब तहसीलदार सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात तलाठी दिलीप देवकते, तावशीकर, बोयने, अव्वल कारकून मंजूर पठाण, लिपीक अनिल कचरे यांचा समावेश आहे. या पथकाने दोन दिवसात सात ठिकाणी धाडी टाकून उपलब्ध मालाची तपासणी केली असल्याचे पथक प्रमुखाने सांगितले.