दौंड, बारामतीत वादळी तांडव
By admin | Published: May 20, 2016 01:57 AM2016-05-20T01:57:25+5:302016-05-20T01:57:25+5:30
तालुक्यात विजेच्या कडकडाटासह काही भागात वादळी पाऊस झाला.
दौंड : तालुक्यात विजेच्या कडकडाटासह काही भागात वादळी पाऊस झाला. वादळाच्या तांडवाने शाळा आणि घरांच्या छपरांचे पत्रे उडून गेले तर विद्युत खांब आणि विद्युत तारांच्या पडझडीसह अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेळ्या आणि जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. एकंदरीतच अवघ्या १५ मिनिटांत लाखोंचे नुकसान झाले आहे.
दुपारी साडेचारच्या सुमारास सर्वत्र ढग भरून आले होते. साडेचार ते पाच या वेळेत पावसाचा शिडकावा झाला. मात्र पाचनंतर विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने थैमान घातले. दौंड शहरात सुमारे २० मिनिटे जोरदार पाऊस होऊन रेल्वे कुरकुंभ मोरीत पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
शहरातही अन्य ठिकाणी पाणी साचलेले होते. नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गोपाळवाडी (ता. दौंड) या भागात जिजामाता शाळेच्या दोन खोल्यांचे तसेच गिरीमजवळ सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या शाळेचे पत्रे उडाले.
बेटवाडी, होलेमळा येथे घरांचे पत्रे उडून विद्युततारा तुटल्याने या भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. कुरुळेवस्ती येथे वादळी वाऱ्याने चार शेळ्या दगावल्याची माहिती पुढे आली आहे. याचबरोबरीने ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांची जनावरे देखील मृत्यूमुखी पडले असल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)
भांडगाव येथे विजांच्या कडकडाटसह झालेल्या मान्सून पूर्व पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा व गाईचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१९) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील शेरीचा मळा येथे घडली. पोपट बाबुराव बोरकर (वय, ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पोपट बोरकर हे सायंकाळच्या सुमारास जोराचा वारा सुटल्याने त्यांची गाय गोठ्यात बांधण्यासाठी गेले होते.
दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. रिमझिम पाऊस देखील येऊ लागला होता. परंतु गोठ्यात गाई बांधत असतानाच वीज पडून पोपट बोरकर व त्यांच्या गाईचा मृत्यु झाला. सदर घटना समजताच तातडीने त्यांना यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. .