बाबरीचा बदला घेण्यासाठी डोसाने दुबईत घेतली होती दाऊद, टायगर मेमनची बैठक
By admin | Published: June 28, 2017 03:49 PM2017-06-28T15:49:07+5:302017-06-28T16:00:09+5:30
विविध शारीरीक व्याधींनी ग्रस्त असलेला डोसा आता वयाने थकला होता पण त्याने त्यावेळी या भीषण कटात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मुंबईला हादरवून सोडणा-या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या मुस्तफा डोसाचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विविध शारीरीक व्याधींनी ग्रस्त असलेला डोसा आता वयाने थकला होता पण त्याने त्यावेळी या भीषण कटात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. 1992 साली अयोध्येत बाबरी मशिद पाडल्यानंतर डोसाने दुबईत एक बैठक बोलावली होती. या बैठकीला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहिम आणि इजाज पठान हजर होते.
सरकारने टाडा कोर्टासमोर ही बैठक झाल्याचे सिद्ध केले. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी मुस्तफा डोसाने दुबई/पाकिस्तानातून स्फोटके, एके-47 रायफल्स असा शस्त्रसाठा रायगडच्या दिघी बंदरात उतरवला होता. 9 जानेवारी 1993 साली ही सामग्री दिगी बंदरात पोहोचली. हा माल उतरवताना कोणीही आठकाडी करु नये यासाठी त्याने त्यावेळच्या कस्टम अधिका-यांनाही लाच दिली होती.
आणखी वाचा
देशात प्रथमच या बॉम्बस्फोटात आरडीएक्स स्फोटकांचा वापर झाला. दुस-या महायुद्धानंतर पहिल्यांदाच कुठल्या दहशतवादी हल्ल्यात इतक्या मोठया प्रमाणावर स्फोटकांचा वापर झाल्याचा सीबीआयचे म्हणणे होते. या प्रकरणी मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा होऊ शकली असती. सध्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपींच्या शिक्षेवर सुनावणी सुरु आहे.
मंगळवारी रात्री उशिरा छातीत दुखत असल्याने डोसाला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर आज दुपारी 3.30च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डोसाने सुनावणी सुरु असताना त्याला ह्दयविकाराचा त्रास असून बायपास सर्जरीची आवश्यकता असल्याने टाडा न्यायालयाला सांगितले होते. डोसाला हायपरटेंशन आणि डायबिटीसचाही त्रास होता. मुस्तफा डोसाचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.
विशेष टाडा न्यायालयाने 16 जून शुक्रवारी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.