दाऊदचे घर देणार ग्रामपंचायतीकडे
By admin | Published: February 24, 2016 01:00 AM2016-02-24T01:00:29+5:302016-02-24T01:00:29+5:30
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे मुंबके (ता. खेड) येथील सरकारजमा झालेले घर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पोलिसांनी तसे पत्रच ग्रामपंचायतीला दिले असून
खेड (जि. रत्नागिरी) : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे मुंबके (ता. खेड) येथील सरकारजमा झालेले घर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. पोलिसांनी तसे पत्रच ग्रामपंचायतीला दिले असून, त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सरपंच अकबर दुदुके यांनी सांगितले. यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्या घराचा लिलाव होणार असल्याचा विषय म्हणजे वावड्याच ठरल्या आहेत.
१९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद कासकर यांच्या मालकीच्या बहुतांश सर्वच मालमत्तांवर सरकारने टाच आणली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये दाऊदचा हात असल्याच्या संशयावरून दाऊदचे मुंबके येथील राहते घरदेखील ३५ वर्षांपूर्वी सरकारने ‘सील’ केले आहे. या इमारतीमध्ये अलीकडेच काही महिन्यांपासून अनोळखी, तसेच संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याने पोलिसांनीही या घराकडे गस्त सुरू केली आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी आपल्याला दिल्याचे, गावचे पोलीस पाटील सदानंद महादेव सालेकर यांनी सांगितले.
हे घर सरकारच्या ताब्यात जाण्याअगोदर काही वर्षे या इमारतीमध्ये दाऊदची लहान बहीण राहत असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. तिच्या मृत्यूनंतर या घरात न राहण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. दाऊदची मोठी बहीण हसिना पारकर हिचे २०१४ मध्ये निधन झाल्यामुळ दाऊदच्या घरात गेल्या १२ वर्षांत कोणाचेही हितसबंध राहिलेले नाहीत. (प्रतिनिधी)
दाऊदच्या या घराचा ताबा घेण्याबाबत पोलिसांनी पत्र लिहून सुचविल्याचे सरपंच अकबर दुदुके यांनी सांगितले. ही इमारत ग्रामपंचायतीने किंवा ग्रामस्थांनी सामाजिक कार्यासाठी वापरावी, असेही सुचविले आहे. यावर ग्रामस्थांचा विचार सुरू आहे.