दाऊदच्या प्रॉपर्टीचा आज लिलाव
By admin | Published: December 9, 2015 01:12 AM2015-12-09T01:12:37+5:302015-12-09T09:19:21+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईस्थित दोन हॉटेलचा बुधवारी जाहीर लिलाव केला जाणार आहे.
मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईस्थित दोन हॉटेलचा बुधवारी जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी तिघांनी तयारी दर्शविली असली, तरी प्रत्यक्ष लिलावावेळी किती उपस्थित राहतात आणि खरोखर बोली लावली जाते का? हे पाहाणे महत्त्वाचे आहे. परळ येथील एका हॉटेलमध्ये सकाळी अकरा वाजता लिलाव प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जाहीर लिलावासाठी ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन, दिल्लीतील व्यावसायिक अजय श्रीवास्तव व आणखी एका व्यक्तीने तयारी दर्शविली आहे. यापैकी बालाकृष्णन यांना दाऊदचा हस्तक छोटा शकीलकडून धमकाविण्यात आल्याने प्रत्यक्षात किती जण लिलावावेळी उपस्थित राहतात, याबाबत साशंकता व्यक्त
केली जात आहे. या ठिकाणी
कोणतीही अनुचित घटना घडू
नये, यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था
व योग्य खबरदारी घेतली जाणार आहे.
मुंबई बॉम्बस्फोटानंतर फरार असलेल्या मोस्ट वॉण्टेड दाऊदच्या मुंबई व देशभरातील मालमत्ता केंद्र सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. त्याची दहशत संपविण्यासाठी या प्रॉपर्टी लिलावाद्वारे विकण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. खासगी कंपन्यांकडे त्याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, भेंडी बाजार येथील पाखमोडिया स्ट्रीटजवळ असलेल्या हॉटेल दिल्ली जायका आणि रौनक अफरोज या हॉटेलचा ९ डिसेंबरला जाहीर
लिलाव करण्याचे निश्चित
केले आहेत. लिलावासाठी आॅनलाइन बुकिंग करण्यात आले आहे.
त्यामध्ये आत्तापर्यंत ३ जणांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. हॉटेलच्या बोलीसाठी किमान ३० लाखांपासून बोलीची सुरुवात केली जाणार
आहे. साधारणपणे सव्वा कोटीपर्यंत त्याचा दर मिळावा, असे
शासनाचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
> जेष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी या लिलावामध्ये सहभाग घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर शुक्रवारी त्यांना छोटा शकीलकडून धमकाविण्यात आले आहे. मात्र, त्यांनी त्याला न घाबरता माघार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. ही प्रॉपर्टी मिळाल्यास त्याचा वापर सामाजिक कार्यात विशेषत: गरीब मुले आणि महिलांच्या मदतीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.