दाऊद टोळीतील ओपी सिंग खुनातील संशयित निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 09:35 PM2017-08-17T21:35:13+5:302017-08-17T21:35:31+5:30
नाशिक : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगणारा दाऊद टोळीमधील गुन्हेगार ओपी सिंग याची २००२ साली कारागृहात हत्या झाली होती. सदर घटना संपूर्ण राज्यभरात गाजली होती. यावेळी शिक्षा भोगणाºया छोटा राजन टोळीच्या डी. के. रावसह तीन पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकाºयांसह १३ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. यावर गुरुवारी (दि.१७) सुनावणी होऊन न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयित आरोपींना निर्दोष ठरविले.
नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक सहाच्या आंघोळीच्या हौदावर २४ नाव्हेंबर २००२ साली दुपारी पावणे तीन ते पावणे चार वाजेच्या दरम्यान ओपी सिंग हौदावर बसलेला असताना त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात राजन टोळीशी संबंध असणारा रविमल्लेश बोरा उर्फ डी. के. राव, निरंजन काशीनाथ शाहू उर्फ बिल्डर, श्रीपाद दिनकर पराडकर, श्रीपाद दिनकर पराडकर, फिरोज उर्फ बशीर खान, शरद प्रकाश दावकर, सुरेश कुटीयनेत, बाळा उर्फ मंगेश नारायण परब, तरप्पा गगनसिंग नेपाळी, चंद्रकांत खोत, बन्या लिंगेरी, सुनील उर्फ मंग्या काकडे, सुरेश उर्फ चंद्रा गुंडप्पा पुजारी, प्रवीण उर्फ मम्म्या थोरात (सर्व रा.मुंबई) हे संशयित आरोपी होते. तसेच मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी शरद शिवाजी शेळके, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधिकारी जयवंत अर्जुनराव शिंदे, भरत बाबूराव म्हस्कर, कारागृहाच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र नामदेव काळे यांचाही ओपी सिंग हत्येच्या कटात सहभाग व गुन्ह्यासाठी मदत केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून सहभाग होता. अशा या गाजलेल्या खटल्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी सबळ पुराव्याअभावी संशयित आरोपींना या गुन्ह्यात निर्दोष ठरविले. यावेळी न्यायालयाने एकूण चौदा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. तळेकर यांनी बाजू मांडली, तर संशयित राव व खान यांच्या वतीने अॅड. श्रीधर माने यांनी युक्तिवाद केला. एकूण १७ संशयित आरोपींपैकी सहा संशयितांचा मृत्यू झाला असून नेपाळी, लिंगेरी, काकडे हे पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. तसेच शाहू, पुजारी व थोरात हे जामीन मिळाल्यानंतर बेपत्ता झाले आहेत.