'दाऊदची पत्नी 2016 मध्ये मुंबईत आली होती,त्यावेळी तिनं माझी भेट घेतली होती'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 02:57 PM2017-09-22T14:57:59+5:302017-09-22T15:34:02+5:30
'2016 मध्ये दाऊदची पत्नी मेहजबीन ही भारतात आली होती, काही दिवसांसाठी ती वर्सोव्यात वास्तव्यास होती, त्यावेळी तिने माझी भेट घेतली होती'
ठाणे - खंडणीच्या आरोपाखील ठाणे पोलिसांकडे अटकेत असलेला मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर एकाहून एक खळबळजनक खुलासा करत आहे. दाऊद इब्राहिमची पत्नी 2016 मध्ये भारतात आली होती असा खुलासा कासकरने केल्याची माहिती आहे.
2016 मध्ये दाऊदची पत्नी मेहजबीन भारतात आली होती, एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारावेळी ती आली होती. त्यावेळी तिने माझी भेट घेतली होती. काही दिवसांसाठी ती वर्सोव्यात वास्तव्यास होती. ती पाकिस्तानच्या पासपोर्टच्या आधारावर भारतात आली होती अशीही माहिती कासकरने ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर चौकशीदरम्यान केला आहे. 'फोन टॅप होत असल्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून माझ्याशी आणि इतर नातेवाईकांशी बोलणं टाळत आहे'. मात्र आपण आपला दुसरा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचा दावा त्याने केला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन अनीस ईद आणि इतर सणांना फोन करतो असं इकबाल कासकरने सांगितलं आहे. 'इकबाल कासकर तपासात सहकार्य करत नसून बोलण्यास नकार देत आहेत. मात्र त्याने आपण 1993 स्फोटातील आरोपी आपला मोठा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचं मान्य केलं आहे', अशीही माहिती त्याने पोलिसांनी दिली आहे.
अनेक प्रश्नांना इकबाल कासकर नकारात्मक उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाऊद आणि इकबाल यांच्यात फोनद्वारे वारंवार संवाद झाल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, व्हीओआयपी (व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) द्वारे हा संपर्क झाल्याची शक्यता असल्यामुळे बाहेरील कॉलही स्थानिक असल्याचे आढळून येते. त्यामुळे पुरावे मिळवताना पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या टोळीमध्ये मुंबई, ठाण्यातील अनेक जण सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड होत आहे. इकबाल हा कोकेनपासून अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. याच कारणामुळे दाऊदची आपल्यावर नाराजी आहे. याच नाराजीमुळे दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलणे झाले नसल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. आता त्यात कितपत तथ्य आहे, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.
दरम्यान, ठाण्यातील काही नगरसेवक आणि नेत्यांचाही सहभाग समोर येत असल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्तांनी केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. मात्र, त्यांचे नाव अद्याप समोर आले नसल्याचे आयुक्तांनी त्यांना सांगितले.
लवकरच चौघांना अटक-
दाऊद टोळीतील काही गुंडांची माहिती इकबालकडून तपास पथकाला मिळाली आहे. त्यामुळे मुंबई परिसरातून आणखी तीन ते चार जणांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. इकबालसोबत ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एकाचा खंडणी प्रकरणात बºयापैकी सहभाग आढळला आहे. त्याचीही अद्याप चौकशी सुरूच आहे. अन्य दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीसाठी दररोज हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.