'ड्राय डे' पूर्वीच दारुचा महापूर, चार दिवसांत २३ धाडी
By admin | Published: February 20, 2017 09:00 PM2017-02-20T21:00:25+5:302017-02-20T21:00:25+5:30
'ड्राय डे' पूर्वीच दारुचा महापूर, चार दिवसांत २३ धाडी
अमरावती : निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ४ दिवस 'ड्राय डे' घोषित करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाभरात अवैध दारू विक्रीला उधाण आले होते. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याभरातील अवैध दारूच्या अड्ड्यावर धाडसत्र राबवून कारवाई करून लाखो रुपयांची दारू जप्त केली. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाच्या सीमेवर पाच जणांना अटक करून तब्बल ३३ लाखांची दारू जप्त केली, तर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत २३ ठिकाणी धाडी टाकून ८७ हजार ५१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२१ फेब्रुवारी रोजी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. बहुतांश शासकीय यंत्रणा कामी लागली आहे. या निवडणुकीत शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याची जबाबदारी पोलीस विभागाकडे आहे. निवडणुक प्रक्रियेत गुन्हेगारी प्रवृत्तीना आळा बसविणे व अवैध व्यवसायावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याचा सपाटा पोलिसांनी चालविला आहे. दरम्यान १९, २०, २१ व २३ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत जिल्ह्याभरात ड्रा डे घोषित केला आहे. 'ड्राय डे'पूर्वीच शहरात दारूचा महापूर आल्याचे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदाता किंवा कार्यकर्त्यांना उमेदवारांना दारूचे प्रलोभन दिले जाते. अशाप्रसंगी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेच्या चार दिवस जिल्ह्यात 'ड्रा डे, घोषित केला आहे. मात्र, तत्पूर्वीच अवैध दारू विक्रीला उधाण आल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूच्या विक्रीकडे विशेष लक्ष केंद्रित करून विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. यात २८ आरोपींना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.
गावठी दारुचा सडवा नष्ट
४अवैध दारू व्यवसाय सुरू असल्याचे सर्वाधिक प्रमाण फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीत दिसून आले. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकासह पोलिसांनी वडाळी, परिहारपुरा, पारधी बेड्यातून हजारो रुपयांची गावठी दारु जप्त करून अड्डे उद्ध्वस्त केले आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारू व्यवसायाकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकाने शहरातील अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. सर्व मार्गावर बंदोबस्त लावला आहे.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त