एसटी, वीज कर्मचा-यांची दिन दिन दिवाळी! बोनसची घोषणा; पीएमपी कर्मचा-यांनाही १२ हजार रुपये बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:31 AM2017-10-14T04:31:44+5:302017-10-14T04:32:36+5:30
राज्य परिवहन महामंडळ (एसटी), सरकारी वीज कंपन्या आणि पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांना भरघोस बोनसची घोषणा करण्यात आल्याने यंदा त्यांची दिवाळी विशेष उत्साहात जाणार आहे.
मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (एसटी), सरकारी वीज कंपन्या आणि पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांना भरघोस बोनसची घोषणा करण्यात आल्याने यंदा त्यांची दिवाळी विशेष उत्साहात जाणार आहे. शासन-प्रशासनाच्या या घोषणेबद्दल कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यानुसार एसटीतील अधिका-यांना ५ हजार आणि कर्मचा-यांना अडीच हजार रुपये बोनससह गतवर्षीच्या जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. यामुळे वेतनवाढ नसली तरी बोनस मिळाल्यामुळे कर्मचारी समाधानी आहेत.
तसेच, कामगार संघटनांसोबत झालेल्या चर्चेनंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व सूत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचाºयांना १३,५०० रुपयांचे आणि कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली.
त्याचबरोबर पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाºयांना ८.३३ टक्के बोनस आणि १२ हजार रुपये बक्षीस देण्याच्या निर्णय घेण्यात आला. पीएमपीच्या स्वारगेट येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मात्र, पीएमपी तोट्यात असल्याने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे बोनसची रक्कम घेणार नाहीत. कर्मचाºयांनाही बोनस न घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.