तहान भागविण्यासाठी रात्रंदिवस ‘झऱ्या’वर!
By admin | Published: April 28, 2016 05:58 AM2016-04-28T05:58:10+5:302016-04-28T05:58:10+5:30
अकोला-गावातील नळांना महिना-महिना पाणी येत नसल्याने जिल्ह्यातीलच खारपाणपट्ट्यातील बारुला भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे
संतोष येलकर,
अकोला-गावातील नळांना महिना-महिना पाणी येत नसल्याने जिल्ह्यातीलच खारपाणपट्ट्यातील बारुला भागात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना रात्रंदिवस ‘झऱ्यां’वर काढावा लागत आहे.
जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील बारुलामध्ये अकोला तालुक्यातील आपोती बु., आपोती खुर्द , आपातापा, आखतवाडा, खोबरखेड, अनकवाडी, शामाबाद, सुलतान अजमपूर, नावखेड, लाखोंडा व घुसरवाडी इत्यादी १२ गावांचा समावेश आहे. खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत बारुलासह ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु अत्यल्प पाऊस झाल्याने, धरणाची जलपातळी खाली गेली आहे. परिणामी काटेपूर्णा धरणातील शिल्लक जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला असून, ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
पाणीटंचाईच्या परिस्थितीत या गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने, अनंत अडचणी निर्माण होत आहेत. या योजनेंतर्गत बारुलामधील गावांना २७ दिवस उलटले तरी पाणी मिळाले नाही. या भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील लोणार नाल्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या ‘झऱ्यां’मधील पाण्याचा वापर करावा लागत आहे. बैलगाडी, सायकल, आॅटोरिक्षामध्ये पाण्याचे कॅन भरून ग्रामस्थ पाणी नेत आहेत; यासाठी महिला-पुरुषांना पायपीटही करावी लागत आहे.
बारुलापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबिकापूर येथील बोअरचे पाणी विकत घेतले जात आहे. अशा प्रकारे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पाणी
विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.