कोरेगाव भीमा बंद करण्याची चर्चा घटनेच्या आदल्या दिवशी; साक्षीदाराची उलटतपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 03:13 AM2018-09-07T03:13:49+5:302018-09-07T03:14:26+5:30
कोरेगाव भीमा बंदची चर्चा १ जानेवारीच्या आदल्या दिवशीपासूनच सुरू होती, असे ठाण्याच्या महिला साक्षीदाराने राज्य सरकारने घेतलेल्या उलटतपासणीत कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला गुरुवारी सांगितले.
मुंबई : कोरेगाव भीमा बंदची चर्चा १ जानेवारीच्या आदल्या दिवशीपासूनच सुरू होती, असे ठाण्याच्या महिला साक्षीदाराने राज्य सरकारने घेतलेल्या उलटतपासणीत कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला गुरुवारी सांगितले. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरये यांनी ठाण्यातील महिला साक्षीदाराची उलटतपासणी घेतली.
घटनेच्या दिवशी पोलीस जाणीवपूर्वक कोरेगाव भीमा येथे नसल्याचा आरोप महिला साक्षीदाराने आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. याबाबत उलटतपासणी घेताना हिरये यांनी महिला साक्षीदाराला विचारले की, गेल्या चार वर्षांत पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे काय व्यवस्था केली आहे? त्यावर साक्षीदाराने आपण कोरेगाव भीमाला पहिल्यांदाच गेल्याचा पुनरुच्चार केला.
यापूर्वी कधी गेले नसतानाही पोलीस जाणीवपूर्वक घटनास्थळावर उपस्थित नव्हते, असा आरोप तुम्ही कसा केला, असा सवाल हिरये यांनी साक्षीदाराला केला. ‘माझे आई-बाबा तेथे अनेक वेळा गेले आहेत. तेथे अनेक लोक जमा होतात. जर दरवर्षी लाखो लोक तेथे जमा होतात तर पोलिसांनी तेथे सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे,’ असे साक्षीदाराने दिले.
दगडफेक झाल्यावर मी आणि मंडळातील काहांनी जेथे तात्पुरता आसरा घेतला तेथे कळले की, कोरेगाव भीमा बंद ठेवण्याची योजना आदल्या दिवशीपासूनच सुरू होती. बंद करण्यात येणार होता, याविषयी काही कागदोपत्री पुरावा आहे का, अशी विचारणा हिरये यांनी केल्यावर साक्षीदाराने नकार दिला.ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी आपण दिलेल्या माहितीचा संपूर्ण उल्लेख एफआयआरमध्ये केला नसल्याचेही साक्षीदाराने आयोगाला सांगितले.
संबंधित महिला साक्षीदाराची गुरुवारी उलटतपासणी पूर्ण झाली असून त्यांच्याच मंडळाच्या अध्यक्षांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. या साक्षीदाराने राज्य पोलीस दलात १० ते १२ वर्षे तर मुंबई पोलिसात १२ ते १३ वर्षे सेवा करून २००६ मध्ये ते पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांची उलटतपासणी शुक्रवारी सुरू राहील.
कागदोपत्री पुरावा नसल्याची दिली माहिती
दगडफेक झाल्यावर मी आणि मंडळातील काही लोकांनी जेथे तात्पुरता आसरा घेतला तेथे मला कळले की, कोरेगाव भीमा बंद ठेवण्याची योजना आदल्या दिवशीपासूनच सुरू होती, असेही साक्षीदाराने सांगितले. बंद करण्यात येणार होता, याविषयी काही कागदोपत्री पुरावा आहे का, अशी विचारणा हिरये यांनी केल्यावर साक्षीदाराने नकार दिला.