मोर्चांनी गाजला दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 04:08 AM2016-08-27T04:08:42+5:302016-08-27T04:08:42+5:30
धर्मराज्य पक्ष आणि फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या संघटनेचे रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते यामुळे शुक्रवारचा दिवस ठाणेकरांसाठी मोर्चाचा ठरला.
ठाणे : अंतर्गत सुरक्षेच्या काद्यातील सुधारणांचा विरोध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने काढलेला मोर्चा, ठाणे शहरातील खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला धर्मराज्य पक्ष आणि फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या संघटनेचे रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते यामुळे शुक्रवारचा दिवस ठाणेकरांसाठी मोर्चाचा ठरला. आधीच रस्त्यांतील खड्ड्यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीत मोर्चांमुळे भर पडली.
अंतर्गत सुरक्षेच्या कायद्याखाली मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न राज्यातील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप करून श्रमजीवी संघटनेचेनेते विवेक पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या कायद्याची होळी केली. नंतर, या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यात पंडित यांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले.
त्यामुळे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. कोर्टनाका, सेंट्रल मैदानापर्यंत दीर्घकाळ कोंडी होती.
मोर्चाच्या बातम्या/पान २ आणि ३
।उपजिल्हाधिकाऱ्यांबाबत कार्यकर्त्यांची नाराजी
श्रमजीवी कार्यकर्त्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे विवेक पंडित यांच्यासह शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास आले. मात्र, ते नसल्यामुळे येथील उपजिल्हाधिकारी विलास गजरे यांच्या दालनात पोलिसांनी या शिष्टमंडळास नेले. अंतर्गत सुरक्षा विधेयकाला विरोध करणारे मोर्चेकऱ्यांचे हे निवेदन अवर सचिवांसाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे द्यायचे होते. चार पानांचे निवेदन पाहिल्यानंतर एक शब्दही न बोलता केवळ होकारार्थी मान हलवून त्यांनी जाण्यास सूचित केले.
उपजिल्हाधिकारी काही बोलत नसल्याचे पाहून पंडित यांनी दिलेल्या निवेदनाची पोच मागितली. ती खाली मिळेल, असे सांगून उपजिल्हाधिकाऱ्यांनी जाण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्ते संतापले. मात्र, पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते व अशोक कुंभार यांनी शिष्टमंडळासे बाहेर काढले. तरीदेखील, सरकारी कामातील या कर्तव्यदक्षतेबद्दल श्रमजीवी संघटना उपजिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाणार आहे.