गोडव्याच्या दिनी राज्यात ६३२ पक्ष्यांवर ‘संक्रांत! बंदी असताना चिनी, नायलॉन मांजाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:52 AM2020-01-16T02:52:37+5:302020-01-16T08:22:06+5:30

राज्यभरात ५२८ पक्षी जखमी, तर १०४ पक्ष्यांचा मृत्यू

On the day of the sweet, there are 3 birds in the state 'infected! Chinese, nylon cat use while banned | गोडव्याच्या दिनी राज्यात ६३२ पक्ष्यांवर ‘संक्रांत! बंदी असताना चिनी, नायलॉन मांजाचा वापर

गोडव्याच्या दिनी राज्यात ६३२ पक्ष्यांवर ‘संक्रांत! बंदी असताना चिनी, नायलॉन मांजाचा वापर

Next

औरंगाबाद : तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देण्याचा मकरसंक्रांतीचा दिवस राज्यातील तब्बल ६३२ पक्ष्यांसाठी मात्र ‘संक्रांती’चा ठरला. ‘लोकमत’ पर्यावरण डेस्कला मिळालेल्या माहितीनुसार घातक मांजामुळे राज्यात बुधवारी ५२८ पक्षी व १६ प्राणी जखमी झाले, तर १०४ पक्ष्यांना जीव गमवावा लागला. अनेक पक्ष्यांचे पंख कापले, तर काहींचे पाय कापले गेले.

राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर आणि अकोला, अशा ११ शहरांमधील ही आकडेवारी आहे. चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही बुधवारी अनेक शहरांमध्ये पतंग उडविण्यासाठी याचा वापर केला गेला. हा मांजा घातक असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. २०१५ साली एका जनहित याचिकेनंतर कोर्टाने या मांजावर बंदी घातली. २०१८ साली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काचेचे लेपन असलेल्या नायलॉन, तंगूसच्या उत्पादनासह विक्रीवर बंदी घातली. मात्र, या मांजाची विक्री काही थांबली नाही.

सर्वाधिक ४२० पक्षी मुंबई परिसरात, तर पुण्यात अंदाजे २२ पक्षी जखमी झाले. उद्या यात आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती पक्षीमित्र संतोष थोरात यांनी दिली. औरंगाबादेत दिवसभरात दोन पक्षी जखमी झाल्याची माहिती पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली. जळगावमध्ये ३, अकोल्यात ५ पक्षी जखमी झाले. त्यातील एक बगळा व कबुतराचा मृत्यू झाला. इतर पक्षांवर यशस्वी उपचार केल्याची माहिती डॉ. मंजूळकर यांनी दिली.

कोल्हापुरात दिवसात ५ घार आणि एक कावळा जायबंदी झाले. या पक्ष्यांवर पांजरपोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले जात आहेत. नाशिकमध्ये एक कबुतर आणि एक वटवाघूळ मरण पावले. इतर २८ पक्षी जखमी झाले. यात १९ कबुतर, २ कोकीळ, एक घार, चार घुबड, एक साळुंखी, एका चिमणीचा समावेश आहे.

अहमदनगर, सातारा, सोलापुरात एकही नोंद नाही
राज्यात अनेक शहरांत बुधवारी पक्षी जखमी झाल्याची नोंद असली तरी, अहमदनगर, सातारा आणि सोलापूरमध्ये मात्र तशी कुठलीही घटना नोंद झाली नाही. सोलापुरात गणेशोत्सवानंतर दसऱ्यापर्यंत पतंग उडविल्या जातात.

पतंगबाजीत एकाचा बळी; दोघे गंभीर जखमी
नाशिक/अहमदनगर: कटलेला पतंग पकडण्याच्या नादात पाय घसरुन विहिरीत पडल्याने बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नाशिक जिल्ह्यात सिन्नरजवळील मापारवाडी येथे घडली.
दुसºया घटनेत औरंगाबाद येथे पतंगाच्या मांजाने एका लष्करी जवानाचा गळा श्वासनलिकेपर्यंत चिरल्याने जवान गंभीर जखमी झाला. जवानावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच नगर-मनमाड रोडवरुन मोटारसायकलवरून जात असताना बोल्हेगाव परिसरात मांजा अडकल्याने एका तरुणाच्या हनुवटीखालील भाग कापला जाऊन तब्बल ३२ टाके पडले़

सर्वाधिक मुंबईत
सर्वाधिक ४२० पक्षी मुंबई परिसरात जखमी झाले. दक्षिण मुंबईत १५२, वांद्रे ते दहिसर परिसरात १७९, नवी मुंबई परिसरात ८९ पक्षी जखमी झाले. दक्षिण मुंबईत ५, उपनगरात ८ आणि नवी मुंबईत ३ प्राणी जखमी झाल्याची माहिती अहिंसा संघाने दिली. जखमी पक्षी, प्राण्यांवर या संघाकडून उपचार केले जातात.

Web Title: On the day of the sweet, there are 3 birds in the state 'infected! Chinese, nylon cat use while banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kiteपतंग