दिवस वाहतूककोंडीचा
By admin | Published: September 23, 2016 04:24 AM2016-09-23T04:24:29+5:302016-09-23T04:34:02+5:30
मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज ये-जा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे
ठाणे : मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज येजा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे शहरात न भुतो न भविष्यती अशी वाहतूककोंडी गुरुवारी अनुभवायला मिळाली. वाहतूकव्यवस्थेतील या बदलाबरोबरच बंदी धाब्यावर बसवून अवजड वाहनांनी शहरात केलेल्या बिनदिक्कत प्रवेशामुळे दहिसर ते वांद्रे भागातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. तीन तासांहून अधिक काळ प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले होते.
वरसोवा पूल नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतून येणारी ही वाहने ठाण्यातून जाऊ लागल्याने नाशिक रोडवरील ताण वाढला आहे. त्याचा फटका ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरांतील वाहतुकीला बसल्याने गुरुवारी सकाळपासून दिवसभर ठाणे जाम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. वाहतूककोंडीत सापडल्याने हैराण झालेल्या वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, कंटाळलेल्या प्रवाशांनी पायी काही अंतर चालणे तसेच काही मिनिटांच्या प्रवासाकरिता चक्क तीन-तीन तास लागत असल्याने महिला व लहान मुले यांचे अतोनात हाल झाल्याचे चित्र या ठिकाणी भेट दिली असता दिसले.
एकीकडे वरसोवा पूल बंद केल्याने ठाण्यात कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे ठाणे आणि कल्याणमध्ये मागील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्याने गणपती विसर्जनाकरिता तात्पुरते टाकलेले डांबर उखडले जाऊन रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मुंब्रा बायपास येथून होणारी वाहतूक सुरळीत होत नसल्याने त्याचा फटका कल्याण-शीळफाटा आणि मुंब्रा बायपास तसेच भिवंडी-मानकोली या परिसरात प्रवास करणाऱ्यांना दिवसभर बसला. येथील वाहतूककोंडीमुळे कल्याण-शीळफाटा, मुंब्रा बायपास, भिवंडी-मानकोली या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांनाही दोन ते तीन तास लागत होते. मुंबई, ठाण्यात १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांच्या प्रवेशास बंदी आहे. त्यांच्या प्रवेशाच्या वेळा निश्चित केलेल्या असतानाही अनेक अवजड वाहने कुठल्याही वेळी रस्त्यावरून जात असल्याचे कसे दिसते, असा सवाल कोंडीत अडकलेल्यांनी केला. कळवा येथील महालक्ष्मी मंदिरापाशी एकाच वेळी पाच पाच वाहतूक पोलीस कोंडाळे करून उभे असल्याचे दिसले. मात्र, ज्या कापूरबावडीपाशी वाहतूककोंडी झाली होती, तेथे वाहतूक पोलीस अभावाने दिसल्याचे काही वाहनचालकांनी निदर्शनास आणले.