मतदानाच्या एक दिवसआधी बीड पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 15:48 IST2019-10-20T15:47:33+5:302019-10-20T15:48:35+5:30
प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना असं बोलणे शोभत नसल्याचे म्हटले आहे. तर पंकजा मुंडे यांना मौन पाळले आहे. एकूणच बीडमधील बहिण-भावाची लढाई आरपारची असल्याचे दिसून येत आ

मतदानाच्या एक दिवसआधी बीड पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जुगंलबंदीमुळे बीड जिल्ह्याचे राजकारण कायमच चर्चेत आले आहे. यानंतर काका-पुतणे आणि आता बहिण-भावामुळे बीड जिल्हा ऐन मतदानाच्या एकदिवस आधी राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी राजकारणाचा वारसा पुढे चालवला आहे. तर त्यांचेच पुतणे धनंजय मुंडे आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी परळी मतदार संघातून धडपडत आहेत.
विधान परिषदेवर आमदार असलेले धनंजय मुंडे आणि पंकजा यांच्यात विधानसभेला थेट लढत होत आहे. त्यामुळे या लढतीला महत्त्व आले आहे. त्यातच धनंजय मुंडे यांची कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतरच पंकजा मुंडे यांना कार्यक्रमात भाषण करतानाच भोवळ आली. या क्लिपमुळेच त्यांना भोवळ आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीच गांभीर्याने घेण्यात येत आहे.
या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढाई रंगलेली होती. परंतु, आता पंकजा आणि धनंजय यांच्यातील लढाई तीव्र झाली आहे. किंबहुना आरोपप्रत्यारोपनंतर उभय नेत्यांनी राजकारण सोडून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचवेळी दोघांनीही जनतेच्या न्यायाची प्रतीक्षा असल्याचे नमूद केले. धनंजय मुंडे यांनी क्लिपमधील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तर प्रितम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना असं बोलणे शोभत नसल्याचे म्हटले आहे. तर पंकजा मुंडे यांना मौन पाळले आहे. एकूणच बीडमधील बहिण-भावाची लढाई आरपारची असल्याचे दिसून येत आहे.