समृद्धी महामार्गावर दिवसाढवळ्या पोलिसांची वसुली; अंबादास दानवेंनी शेअर केला व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 07:28 PM2023-06-01T19:28:38+5:302023-06-01T19:29:28+5:30
'गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा..!' दानवेंचा सरकारला टोला
समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सामान्यांच्या वापरासाठी सुरू झाल्यापासून अनेकदा चर्चेत आला आहे. बहुतांशवेळा अपघातामुळे चर्चेत येणारा समृद्धी महामार्ग आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. या महामार्गावर सर्रास पोलिसांची वसुली सुरू असल्याचे समोर आले आहे. समृद्धीवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडवून, त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट केला आहे.
काही महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचे उद्घाटन झाले. यानंतर अनेकदा हा महामार्ग अपघातांमुळे चर्चेत आला. मात्र सद्या हा महामार्ग पोलिसांच्या वसुलीमुळे चर्चेत आला आहे. महामार्ग पोलिसांच्या वसुलीचा व्हिडीओ अंबादास दानवे यांनी ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत. “समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी 'समृद्धी' येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!..” असे दानवे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
व्हिडीओत काय आहे ?
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी 'समृद्धी' येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!#samruddhi#expressway#समृद्धी@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@DGPMaharashtrapic.twitter.com/iIsSQeUxbQ
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 31, 2023
अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत एक पोलिस एका वाहनचालकाकडून काही तरी घेऊन खिशात घालत असल्याचे दिसत आहे. तसेच, दुसऱ्या ठिकाणी दोन पोलिस असेच करत असल्याचे दिसून आले. अनेकांना रोखून पोलीस त्यांच्याकडून काहीतरी घेऊन गुपचूप खिशात घालताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर चौकशी सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक अनिता जमादार यांनी माध्यमांना दिली आहे.