शेतकऱ्यांना दिवसा वीज; राज्यात ९ हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती; ४० हजार कोटींची गुंतवणूक, २५ हजार रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 07:40 AM2024-03-08T07:40:44+5:302024-03-08T07:41:50+5:30
...त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर देकारपत्रांचे (लेटर ऑफ अवॉर्ड) वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज मिळणार आहे.
मुंबई : राज्यात ९ हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती करण्यात येणार असून त्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. २५ हजार जणांना रोजगार मिळेल. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर देकारपत्रांचे (लेटर ऑफ अवॉर्ड) वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी २०१६ मध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. त्यानंतरच्या काळात २ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली. आता ९ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होणार असून, त्यामुळे ४० टक्के कृषी फिडर हे सौर ऊर्जेवर येतील.
या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे. हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण करायचा असला तरी सर्व यंत्रणांनी जलद काम केले तर ते १५ महिन्यांतच पूर्ण होईल. पुढील दोन ते तीन वर्षांत ८ लाख सौर ऊर्जा पंपसुद्धा सरकार देईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना १.२५ लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे दिले जाते. यावेळी हुडकोसोबत सामंजस्य करार करण्यात आला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.