डीसीसी बँकेच्या चेअरमनने परीक्षेत केलेली कॉपी येणार अंगलट !

By admin | Published: November 18, 2016 09:23 PM2016-11-18T21:23:14+5:302016-11-18T21:23:14+5:30

एमबीए (मास्टर आॅफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) परीक्षेत गुरुवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह १०० वर विद्यार्थ्यांना कॉपी करताना

DCC bank chairman can get copied exam! | डीसीसी बँकेच्या चेअरमनने परीक्षेत केलेली कॉपी येणार अंगलट !

डीसीसी बँकेच्या चेअरमनने परीक्षेत केलेली कॉपी येणार अंगलट !

Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 18 - एमबीए (मास्टर आॅफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) परीक्षेत गुरुवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह १०० वर विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले होते. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके, उपसचिव डॉ. मुकुंद कराळे यांनी शुक्रवारी केंद्राची झाडाझडती घेतली. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे येथील मिलिया महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर एमबीएच्या परीक्षा सुरू आहेत. गुरुवारी विद्यापीठाचे सहकेंद्र प्रमुख प्रा. डॉ. दादासाहेब जोगदंड यांनी दोन सत्रांत १०० हून अधिक विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले होते. दुपारच्या सत्रात जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्याकडेही कॉपी आढळून आली. डॉ. जोगदंड यांनी त्यांची उत्तरपत्रिका जप्त करून ती विद्यापीठाला पाठवली.
दरम्यान, परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट झाल्याचे समोर येताच कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची घटनेची गंभीर दखल घेत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके, उपसचिव डॉ. मुकुंद कराळे यांना बीडला पाठविले. त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. यावेळी कॉपी आढळून आली नाही.
दरम्यान, सारडा यांनी मी डीसीसी बँकेचा अध्यक्ष असल्याने मला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळावी, अशी मागणी करून केंद्र प्रमुखांशी हुज्जत घातल्याचा धक्कादायक खुलासाही समोर आला आहे.
 
बीडमध्ये तीव्र प्रतिक्रिया
जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना कॉपी करताना पकडल्याने बीडमध्ये शुक्रवारी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. स्वत:कडे शिक्षण संस्था असूनही त्यांनी अशा प्रकारे वर्तन करावे, याबाबत कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या समितीमार्फत त्यांच्यावर होणा-या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
व्यक्ती कुठल्याही पदावर असो, विद्यार्थी म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते. बीड येथील सहकेंद्र प्रमुखांनी दिलेला अहवाल विद्यापीठाच्या समितीसमोर येईल. कुलगुरूंच्या परवानगीने या समितीमार्फत संबंधितावर योग्य ती कारवाई होईल. विद्यापीठ कुणालाही पाठीशी घालणार नाही.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
 
आदित्य सारडा यांनी उत्तरपत्रिका जप्त केल्यावर ‘मी पास होऊन दाखवतो, असे आव्हान दिले होते. शिवाय, मी डीसीसीचा अध्यक्ष असल्याने मला वेगळ्या कक्षात परीक्षेला बसू द्यावे, असा हट्ट धरला होता.
- प्रा. डॉ. दादासाहेब जोगदंड, सहकेंद्र प्रमुख, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Web Title: DCC bank chairman can get copied exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.