डीसीसी बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांना ६ आॅगस्टपर्यंत दिलासा
By admin | Published: July 22, 2016 06:57 PM2016-07-22T18:57:56+5:302016-07-22T18:57:56+5:30
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणी अंबाजोगाई येथील अपर व सत्र न्या. एन. एस. कोले यांनी शुक्रवारी ६ आॅगस्टपर्यंत
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 22 - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणी अंबाजोगाई येथील अपर व सत्र न्या. एन. एस. कोले यांनी शुक्रवारी ६ आॅगस्टपर्यंत दिलासा दिला आहे. तपासी पोलिस अधिकारी रजेवर गेल्याने जामीन अर्जावर अंतिम निर्णय आता ६ आॅगस्ट रोजी होणार आहे.
संत जगमित्र नागा सूतगिरणीच्या बेकायदेशीर कर्जप्रकरणात अंतरिम जामीन मिळावा यासाठी त्यांनी प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे पुत्र अनिकेत निकम यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्याने सुनावणी दरम्यान हजर रहावे, असे आदेश दिले होते. अंबाजोगाई येथील अप्पर पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी तपासी पोलिस अधिकारी रजेवर असल्याचे पत्र न्यायालयाकडे पाठवले होते. जामीन अर्जाची सुनावणी आता ६ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
सारडा, सोळंके, काळे यांनाही दिलासा...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात गुरुवारी आ. अमरसिंह पंडित यांना येथील न्यायालयाने विधीमंडळ अधिवेशन संपेपर्यंत अटक करता येणार नाही, असे आदेश दिले होते. पाठोपाठ शुक्रवारी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा, माजी संचालक शोभा काळे, धैर्यशिल सोळंके यांनाही दिलासा मिळाला. २ आॅगस्टपर्यंत या तिघांना अटक करु नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या तिघांनाही न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत.